यवतमाळ : दारव्हा आगारातील संपकरी एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागण्या सह संपावर ठाम आहेत तर प्रशासनाकडून संप मागे घेण्यासाठी सक्ती केल्या जात आहे. तसेच, अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातही तणावाची परिस्थिती आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत अब्दुल जमील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.