लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या काही बसेसना मालवाहू वाहन केले आहे. महाकार्गोच्या स्वरूपात या मालवाहू ट्रकमधून विविध वस्तूंची ने-आण केली जात आहे. खासगी ट्रकच्या तुलनेत एसटीचा ट्रक सर्वाधिक फायद्याचा ठरत आहे. ग्राहकांना सुविधा पुरविण्यासोबत वाजवी दरात ट्रकमधून विविध वस्तूंची ने-आण करण्यात येत आहे. यामध्ये शेतमाल, लोखंड, सिमेंट, विटा, गिट्टी यासह विविध वस्तू नेण्यासाठी ट्रकचा वापर होत आहे. या ट्रकला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे महाकार्गोने लाॅकडाऊन काळात एक कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई करताना यावर असलेले चालक मात्र दुर्लक्षित झाले आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा अधांतरी आहेत. एकवेळेस मालवाहू वाहन गेल्यानंतर परत दुसरी ट्रीप मिळेपर्यंत त्यांना तिथेच थांबावे लागते. याशिवाय जर परत यायचे असेल, तर स्वत:च्या खर्चाने परत यावे लागते. लाॅकडाऊनमुळे तेही शक्य होत नाही. यातून अडचणी वाढल्या आहेत.
कोरोना काळात एक कोटीची कमाईराज्य परिवहन महामंडळाने महाकार्गो मालवाहतूक ट्रकने करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत उतरलेल्या या ट्रकने चांगलीच कमाई केली आहे.कोरोना काळात ट्रकने तीन लाख १३ हजार ९९५ किलोमीटरचा प्रवास करीत एक कोटी १९ लाख ३४ हजार ४१५ रुपयांची कमाई केली आहे.एसटीला पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून महाकार्गो यशस्वी ठरत आहे. प्रत्येक ठिकाणावरून एसटीच्या ट्रकला मागणी येत आहे.
परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तिथेच मुक्काम- महाकार्गो वाहतूक यशस्वी ठरत असताना, ही वाहतूक यशस्वी करणाऱ्या चालकाच्या सोयी-सुविधांकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. माल घेऊन जाणाऱ्या कार्गो ट्रकला भाडे देताना एक ते दोन दिवस अथवा आठ दिवसांचाही कालावधी लागतो.- ट्रक तेथे पोहोचल्यानंतर परतीची ट्रीप मिळाल्याशिवाय ट्रक परत आणता येत नाही. यामुळे चालकाला आठ ते दहा दिवसांचा मुक्काम पडू शकतो. या काळात त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था त्यांना स्वत:च करावी लागते. या काळासाठी ॲडव्हान्सही हाती पडत नाही.
चालक म्हणतात....
ट्रकमधून वाहतूक करताना सोबत एका दिवसाचा डबा घेऊन जातो. मात्र, समोरच्या दिवसाच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था अडचणीत येते. स्वत:जवळचा पैसा खर्च करावा लागतो. अनेक समस्या येतात. - सुनील कांबळे
ज्याठिकाणी माल उतरविण्यात येतो, त्याठिकाणी दुसरी ट्रीप मिळेपर्यंत मुक्काम करावा लागतो. जेवणाची व्यवस्था नसते. पाण्याचीही व्यवस्था नसते. ट्रक सोडून इतरत्र जाताही येत नाही. अशा स्थितीत जवळचे पैसे खर्च होतात.- धनंजय सायगन
ॲडव्हान्स मिळालाच नाही, पगारातून व्यवस्था- मालवाहतूक करताना चालकाचा नंबर लागला, तर त्याला निवासासाठी मुक्कामी थांबण्याची वेळ येते.- ज्याठिकाणी मुक्काम पडणार आहे, त्याठिकाणी खर्च करण्यासाठी ॲडव्हान्स म्हणून पैसे मिळत नाहीत. - ॲडव्हान्स दिला जाणार असल्याची एसटी महामंडळाची घोषणा असली तरी, प्रत्यक्षात हा ॲडव्हान्स चालकांच्या हातात पडलेला नाही.- हाती येणाऱ्या पगारातूनच त्यांना संपूर्ण व्यवस्था करावी लागते. यामुळे पगारातील पैसाही खर्च होऊन घरखर्च अडचणीत येतो.
मध्यंतरी एक अध्यादेश निघाला होता. दोन दिवसांपेक्षा चालकाचा जास्त मुक्काम नसावा. मात्र, हा अध्यादेश अमलात आला नाही. चालक मन लावून काम करत आहेत. त्यांना सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरच महाकार्गोमध्ये समोरील काळात भरभराट दिसून येईल.- सदाशिव शिवनकर,कामगार संघटना