यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना बारमाही पाससाठी संघर्ष करावा लागत आहे. आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या शेजारील राज्यात कर्मचाºयांना मोफत पास मिळतो, मात्र महाराष्ट्रात विकत पाससाठीही भांडावे लागत आहे.महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना वर्षातून केवळ दोन महिन्यांचा पास नि:शुल्क दिला जातो. पती-पत्नीस बारमाही पास ५०० रुपयांत मिळावा, अशी या कामगारांची मागणी आहे. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने १२ वर्षांपासून ही मागणी रेटून धरली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बारमाही पास देण्याविषयी तीन महिन्यांत अहवाल शासनाला सादर करावा, असे आदेश एसटीच्या उपमहाव्यवस्थापकांना दिले होते. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांचे सरकार असताना हा प्रश्न मार्गी लावला नाही.युती सरकारच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन परिवहनमंत्री प्रमोद नवलकर यांनी दोन महिन्यांचा मोफत पास देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार संघटनेच्या नागपूर येथील अधिवेशनात पासच्या प्रश्नाविषयी विचार केला जाईल, असे जाहीर केले होते. एक हजार रुपयात पास देण्याबाबतचा अहवालही प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. विद्यमान सरकारकडून हा प्रश्न निकाली निघेल अशी आशा आहे, असे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना (अमरावती)चे प्रादेशिक सचिव भास्कर भानारकर यांनी सांगितले.
एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा पाससाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:07 AM