तालुका व तहसील कार्यालयात अनेक तलाठी, मंडळ अधिकारी, लेखा विभाग, नायब तहसीलदार व पुरवठा विभागासह अन्य विभागात अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. त्यांना रुजू होऊन अनेक वर्षे लोटली आहेत.मात्र, अद्यापही त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. दुसरीकडे वरिष्ठांचा वरदहस्त नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. मात्र, ज्यांनी वरिष्ठांसोबत संबंधांचे जाळे मजबूत केले, अशाच बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
एखाद्या कर्मचाऱ्याचा जास्त वर्षांचा कालावधी झाला, की कामकाजामुळे त्यांचा प्रत्येक राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत संबंध येताे. वरिष्ठांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण होतात. यातून त्यांची बदली थांबली आहे. राजकीय व्यक्तीसुद्धा कामाचा माणूस म्हणून वरपर्यंत राजकीय बळाचा वापर करून अशा कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यास सहकार्य करतात. त्यामुळे अनेकांनी येथे ठाण मांडले आहे. साधारण कर्मचारी मात्र कुणीही पाठीराखा नसल्यामुळे नियमाप्रमाणे इतरत्र बदलून जातात. मात्र प्रशासकीय कालावधी पूर्ण होऊनही अनेक कर्मचारी बस्तान मांडून बसतात.
बॉक्स
त्यांना बाहेरचा रस्ता दाखवाच
काही तलाठी, मंडळ अधिकारी यांनी ले आउटमध्ये स्वतः भागीदारी सुरु केल्याची चर्चा आहे. असे कर्मचारी मार्च महिन्याअखेर वरिष्ठांसोबत संबंध जोपासून कायम राहतात. मनाप्रमाणे खंड व सजाची मागणी करतात. वरिष्ठांनी त्यांचा रुजू कालावधी पाहून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेतल्यास ते बदलीस पात्र ठरू शकतात. अशांना आता बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी होत आहे.