लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाच्या उर्मट आणि असहकार भूमिकेमुळे संतप्त बेरोजगार आणि शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मागील वर्षभरात अनेकदा प्रत्यक्ष भेटूनही बेरोजगारांना मुद्रा लोण मिळाले नाही. शेतकऱ्यांनाही कजार्पासून वंचित ठेवण्यात आले. वारंवार विचारणा करून आणि चर्चा करूनही कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना अद्याप कर्ज वितरण केले नाही. व्यवस्थापकाने कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मुद्रा लोण व स्वयंरोजगार प्रकरणे त्वरित निकाली काढावी. तसेच कर्जमाफितील पात्र शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करुन द्यावे, या मागणीसाठी डेमोक्रोटिक युथ फ्रंट आॅफ इंडियाने गुरूवारपासून येथील बँकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यात अंकुश आडे, सतीश राठोड, कैलास राठोड, नामदेव आडे, फरीद राठोड, बाबूराव कांबळेसह शेतकरी व बेरोजगार सहभागी आहेत. न्याय न मिळाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
फुलसावंगीत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:14 PM