यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेची नोटीस जिल्हा परिषद सदस्यांना देण्यातच आली नाही. त्यामुळे सभेचा कोरम पूर्ण नसल्याने शुक्रवारी आयोजित सभा तहकूब करण्याची नामुष्की जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्यावर ओढावली. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मग्रुरीमुळे प्रशासनाची वाताहत झाली आहे. स्थायी समितीच्या सभेसाठी अध्यक्ष आरती फुपाटे यांनी सलग दोन वेळा स्वतंत्र आढवा बैठक घेतली. समिती समोर येणारे विषय निकाली काढण्यासाठी अध्यक्ष स्वत: दक्ष असतात. त्यातुलनेत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. स्थायी समितीची सभा असल्याची नोटीसच अनेक सदस्यांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे सभेला दोन ते तीनच सदस्यांनी हजेरी लावली. दुपारी एक वाजता आयोजित बैठकीला सदस्य संख्याच जुळली नाही. त्यामुळे शेवटी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी सभा तहकूब केली. उपस्थित असलेल्या विभाग प्रमुखांकडून त्यांनी आढावा घेतला. या नियोजित सभेपूर्वी जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्ष फुपाटे यांनी घेतली. त्यानंतर सर्व विभाग प्रमुख स्थायी समिती सभागृहात उपस्थित होते. मात्र वेळेपर्यंत सदस्य संख्या पूर्ण झालीच नाही. वैयक्तीक काम घेऊन असलेल्या स्थायी समिती सदस्याला जिल्हा परिषदेत आल्यानंतर सभा असल्याची माहिती मिळाली, यावरून हा प्रकार उघडकीस आला. सत्तेत असल्यामुळे या सदस्यांने नाव न सांगण्याचा अटीवर जिल्हा परिषदेच्या कारभाराचे अनेक नुमने कथन केले. (कार्यालय प्रतिनिधी)
स्थायी समिती सभेचे सदस्यांना निमंत्रणच नाही
By admin | Published: February 28, 2015 1:58 AM