पुसद : तालुक्याच्या ग्रामीण भागात तत्काळ बससेवा सुरू करावी, अशी मागणी माळपठार युवा मंचने एका निवेदनातून आगार प्रमुखांकडे केली आहे.
मागील दोन वर्षापासून ग्रामीण भागातील बससेवा बंद होती. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील बससेवा सुरू करावी, असे पत्र देऊनही ग्रामीण भागात लोकल व मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यात आली नाही, त्यामुळे प्रवासी व विध्यार्थ्यांना ये-जा करण्यास आर्थिक भुर्दंडासह मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खासगी रिक्षा, ऑटोरिक्षा चालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे.
गोरगरीब ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्याचा निषेध म्हणून आणि ग्रामीण भागातील व शालेय बससेवा तत्काळ सुरू करण्यासंदर्भात माळपठार युवा मंचच्या वतीने पुसद आगार प्रमुख अभिजित कोरटकर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी ३ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्याची ग्वाही दिली. यावेळी सुनील ढाले, युवराज चव्हाण, संजय आडे, विजय मुकाडे, दिलीप मस्के, सुनील चव्हाण, विशाल जाधव, निलानंद चव्हाण, विक्की चव्हाण आदी उपस्थित होते.