राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपाच्या विविध आघाड्यांवरील अपयशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये ‘अच्छे दिन’ची चिन्हे दिसू लागली असली तरी मुळात जिल्ह्यात काँग्रेस पक्षात उमेदवारीबाबत प्रचंड संभ्रमाची स्थिती पाहायला मिळते आहे. नेतेच काही स्पष्ट सांगू शकत नसल्याने कार्यकर्ते सैरभैर दिसत आहेत.जिल्ह्यात २०१४ पूर्वी सात पैकी पाच विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होते. मात्र मोदी लाट व नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे जनतेने काँग्रेसचे पाणीपत केले. या पराभवानंतरही एक-दोन अपवाद वगळता काँग्रेसचे बहुतांश नेते रस्त्यावर उतरण्याऐवजी घरात बसून राहिले. काही नेते तर निवडणुका एक-दीड वर्षावर येऊनही अजूनही घराबाहेर निघालेले नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारच्या गेल्या तीन-चार वर्षातील कामगिरीवर जनता फार खूश नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे तर भाजपाविरूद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे. ‘युतीपेक्षा आघाडीच बरी’ असा जनतेचा सुर आहे.एकूणच भाजपा सरकारबाबत जनतेत प्रचंड नाराजी आहे. परंतु ती कॅश करण्यात काँग्रेस कमी पडत आहे. त्यासाठी काँग्रेसची आक्रमकता दिसत नाही. एक-दोन मोर्चे वगळता काँग्रेस शांतच आहे. भाजपाच्या विरोधातील नाराजीचा आपल्याला आयताच फायदा होईल ही काँग्रेस नेत्यांची मानसिकता आहे. तसे झाले तर ते काँग्रेसचे यश नव्हे तर भाजपाच्या अपयशाने विजयी झाल्याचे मानले जाईल.आजच्या स्थितीत जिल्हा काँग्रेसमध्ये विविध स्तरावर संभ्रमाची स्थिती पाहायला मिळते. एकतर अनेक वर्षे जिल्हाध्यक्षपदाचा वाद सुटला नाही. त्यावर आता पडदा पडला असता नेते मंडळी अध्यक्ष ‘ज्युनिअर’ असल्याचे सांगून त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत चित्र स्पष्ट आहे. तेथे काँग्रेसचाच उमेदवार राहणार आहे. मात्र या मतदारसंघात उमेदवारीचा घोळ आहे. उमेदवार पिता-पुत्रांपैकी नेमका कोण?, जुनाच चेहरा कायम राहाणार की ऐनवेळी आणखी कुणी पुढे येणार असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो. नेमकी अशीच स्थिती चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात आहे. वणी काँग्रेसचे परंपरागत उमेदवार यावेळी विधानसभा लढणार की लोकसभा हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभा मतदारसंघांमध्येही संभ्रम आहे. वणीमध्ये पिता, पुत्र, पुतण्या, ‘वेटिंग’वरील कार्यकर्ता की ऐनवेळी पक्षातील दुसराच कुणी अशा वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात. आर्णीमध्येसुद्धा पिता की पुत्र ही चर्चा आहेच. यवतमाळात नेमकी अशीच स्थिती आहे. काँग्रेसचा जुनाच उमेदवार रिपिट होणार की ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या अनुभवी पदाधिकाऱ्याला संधी मिळणार, याची चर्चा होताना दिसते. दिग्रस विधानसभा मतदारसंघातसुद्धा नेहमी दावा सांगणारा काँग्रेसचा जेष्ठ उमेदवार रिंगणात उतरणार की पुन्हा अदखलपात्र उमेदवार देणार, की हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. उमरखेड मतदारसंघातसुद्धा काँग्रेसचा अनुभवी उमेदवार किल्ला लढविणार की शेजारच्या जिल्ह्यातून आयात होणार, असा प्रश्न काँग्रेसच्या गोटात उपस्थित केला जात आहे.राष्ट्रवादीला हव्या दोन नव्या जागाजिल्ह्यात सध्या केवळ पुसद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र लढले असले तरी यावेळी हे दोनही पक्ष आघाडीत लढण्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने यावेळी पुसदसोबतच वणी, यवतमाळ या मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. वणीच्या जागेसाठी परळी मतदारसंघ सोडण्याची तयारी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नुकतीच जाहीर कार्यक्रमात दर्शविली होती. यवतमाळसाठीसुद्धा राष्ट्रवादीकडून तशाच तयारीवर जोर लावला जात आहे.दिल्ली चमूच्या राजकीय अभ्यासात काँग्रेसला वातावरण पोषकसुमारे तीन महिन्यांपूर्वी दिल्ली व बिहारच्या चमूकडे विदर्भातील सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या राजकीय अभ्यासाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या चमूने जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला. त्यात केवळ पक्ष म्हणून जनतेशी चर्चा झाली. मतदारसंघातील समस्या काय, गतवेळी कुणाला मत दिले, त्यांनी आश्वासनांची पूर्ती केली का, यावेळी कुणाला पसंती, यासारखे प्रश्न विचारले गेले. भाजपा सरकारच्या कामामुळे शेतकरी, सामान्य नागरिक व समाजातील विविध घटक समाधानी नसल्याचे तसेच जिल्ह्यात काँग्रेससाठी पोषक वातावरण असून सात पैकी चार मतदारसंघ काँग्रेसला हमखास मिळू शकतात, अन्य एका मतदारसंघात परिश्रमाची गरज आहे, असे निष्कर्ष नोंदविले गेले होते. त्याचा अहवाल महिनाभरापूर्वी दिल्लीत सादर करण्यात आला.
जुलैमध्ये आणखी एक सर्वेक्षणविदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसला विदर्भाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दिल्लीतून विदर्भावर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. त्या अनुषंगाने जुलैपासून विदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय सर्वेक्षण काँग्रेसकडून केले जाणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची मदत घेतली जाईल. या सर्वेक्षणातसुद्धा उमेदवार नव्हे तर पक्ष हाच केंद्रबिंदू राहणार आहे. विशेष असे, या सर्वेक्षणावर पक्षात नंतर खुली चर्चा घडवून आणली जाईल. कोणत्या मतदारसंघात काय समस्या आहेत आणि तेथे काय करायला हवे, याबाबत सूचनाही केल्या जाणार असल्याची माहिती आहे.