काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर : राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही बंडाची तयारी, अल्पसंख्यक मतदारांची नाराजी राजेश निस्ताने - यवतमाळ विधानसभेच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क तोडण्यात गेल्या सहा वर्षात खुद्द प्रदेशाध्यक्षांनाही यश न आल्याने काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. शिवसेनेचे संजय राठोड या मतदारसंघाचे आमदार आहे. त्यांनी माजी मंत्री माणिकराव ठाकरे, संजय देशमुख यांचा पराभव केला. हा मतदारसंघ माणिकरावांचा परंपरागत आहे. दिग्रस-दारव्हा-नेर या तीनही तालुक्यात शिवसेनेचे गावागावात नेटवर्क आहे. हे नेटवर्क तोडून संजय राठोड यांना मात देण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले गेले. परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. या मतदारसंघात काँग्रेसमध्ये प्रचंड मरगळ आल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसकडे मुरब्बी कार्यकर्ते असूनही प्रदेशाध्यक्षांना त्यांचा पक्षासाठी लाभ करून घेता आलेला नाही. माणिकरावांचा या मतदारसंघातील संपर्क तुटला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मतदारसंघाला आणि तेथील सामान्य कार्यकर्त्यांना गेल्या सहा वर्षात काय दिले, असा जाहीर सवाल उपस्थित केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून शब्दाला किंमत असताना माणिकरावांनी एकही कार्यकर्ता मोठा केला नाही. मंडळ, महामंडळ रिक्त ठेवले पण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. त्यामुळेच अल्पसंख्यक समाज काँग्रेसवर नाराज आहे. यावेळी काँग्रेसला ‘हात’ दाखविण्याची मानसिक तयारी अल्पसंख्यक मतदार करीत आहे. शिवसेनेच्या नेटवर्कमुळे या मतदारसंघात निवडणूक लढविण्याची हिंमत माणिकराव दाखविणार नाहीत, असा प्रत्येकालाच आत्मविश्वास आहे. स्वत:ऐवजी ते मुलगा राहुल ठाकरे यांना रिंगणात उतरविणार आहे. काँग्रेसचे नेटवर्क कोलमडल्याने मुलासाठी दिग्रस ऐवजी यवतमाळातून चाचपणी केली गेली. मात्र यवतमाळात उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची चिन्हे पाहून पुन्हा काँग्रेसने दिग्रसकडेच मोर्चा वळविला. गेल्या वेळी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारामध्ये मताचे अंतर ५० हजारापेक्षा अधिक होते. हे अंतर ठाकरे पिता-पूत्रांना कमी करता आले नाही. संपर्क नसल्याने ते आणखी वाढले. गेल्या वेळी संजय देशमुखांना उमेदवारी दिली गेली असली तरी ठाकरे समर्थकांनी आपले काम केले नाही, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. यावेळी राहुल ठाकरेंसोबतच उमेदवारीसाठी पुन्हा संजय देशमुख, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिक्षक नेते राजुदास जाधव यांची नावे चर्चेत आहे. शिवसेनेकडून संजय राठोड यांना सध्या तरी पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर फेरबदलामध्ये दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला सुटला नाही तरीही एकदा निवडणूक लढवायचीच या निर्धाराने इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी शिवसेनेला दहा हजार मतांची आघाडी होती. यावेळी ती तब्बल २७ हजारांवर पोहोचली आहे. काँग्रेससाठी मतांची ही पिछाडी धोकादायक संकेत देत आहे. माणिकरावांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा मतदारसंघात कुणालाच लाभ नाही, संपर्क नाही, पक्ष कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशी काँग्रेसच्या गोटातीलच ओरड आहे. मतदारसंघात कोण अधिकारी आला, कोण येणार याची ठाकरे पिता-पूत्रांना खबरबात राहत नाही, त्यांच्या नावावर निकटवर्तीयांकडून मात्र अधिकाऱ्यांच्या सोईच्या बदल्यांची दलाली निश्चित केली जाते. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होते. त्यासाठी सर्रास ‘भाऊंचा आदेश’ असा वापर केला जातो.
शिवसेनेच्या नेटवर्कपुढे प्रदेशाध्यक्ष हतबल
By admin | Published: June 15, 2014 11:47 PM