तात्काळ प्रतिसाद : पालकमंत्री शासकीय वाहनच वापरत नाहीतयवतमाळ : मंत्री व अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील लालदिवे १ मेपासून काढण्याचा निर्णय केंद्र शासनाने बुधवारी घेतला. या निर्णयाची भाजपाच्या मंत्र्यांनी तात्काळ अंमलबजावणी सुरू केली. मात्र सेनेकडून कोणत्याही हालचाली नव्हत्या. परंतु गुरुवारी यवतमाळ येथील शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या वाहनावरील लालदिवा काढून या निर्णयाला तात्काळ प्रतिसाद दिला. लालदिवा काढण्याचा निर्णय झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगेच आपल्या वाहनावरील दिवा काढला होता. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री यांनी लालदिवे काढून घेतले होते. अन्य मंत्री हे दिवे केव्हा काढतात, याची प्रतीक्षा केली जात होती. महसूल राज्यमंत्री संजय राठोड मुंबईला होते. गुरुवारी सकाळी ते मुंबईहून धामणगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचले. त्यांना रिसिव्ह करण्यासाठी शासकीय वाहन गेले होते. मात्र राठोड यांनी या वाहनात बसण्यापूर्वी त्यावरील लालदिवा काढून घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार लालदिवा नसलेल्या शासकीय वाहनातून ना.संजय राठोड यवतमाळात पोहोचले. जिल्ह्यात भाजपा नेते मदन येरावार हे ऊर्जा व बांधकाम राज्यमंत्री आहेत. ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. परंतु त्यांनी सुरुवातीपासूनच शासकीय वाहन वापरणे टाळले आहे. ते सहसा आपले खासगी वाहनच शासकीय दौऱ्यात वापरतात. त्यावर लालदिवा नसतो. शासकीय वाहनच वापरत नसल्याने त्यावरील लालदिवा काढण्याचा प्रश्नच ना. मदन येरावार यांच्यासाठी उपस्थित होत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याकडे लालदिवा आहे. मात्र त्यांचे लालदिव्याचे हे शासकीय वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात उभे आहे. त्यामुळे ते लालदिवा काढणार की ठेवणार हे अद्याप स्पष्ट नाही. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे मुंबईत आहेत. जिल्ह्यात दाखल झाल्यानंतरच त्यांच्या वाहनावरील लालदिवा ते १ मेपूर्वी काढतात का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मंत्र्यांप्रमाणेच अधिकाऱ्यांनाही लालदिवा काढावा लागणार आहे. जिल्ह्यात मात्र प्रशासकीय स्तरावर लोकप्रतिनिधींप्रमाणे तत्काळ अंमलबजावणी सुरू झालेली नाही. प्रशासनाला याबाबतच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी) दुचाकी फेरफटका चर्चेत ना. मदन येरावार हे पोलीस सुरक्षा घेणेही टाळतात. ना. येरावार कित्येकदा दुचाकी वाहनाने शहरात फिरताना दिसतात. त्यांचे हे दुचाकीवर फिरणे व कुणालाही सहज कुठेही उपलब्ध होणेच मतदारांना सर्वाधिक अपिल होत असल्याचे सांगितले जाते.
महसूल राज्यमंत्र्यांनी काढला लालदिवा
By admin | Published: April 21, 2017 2:09 AM