दिग्रस --- मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे मंगल कार्यालये ओस पडली. सध्या तीच अवस्था आहे. त्यात आणखी कडक निर्बंध लावल्यामुळे मंगल कार्यालये पांढरा हत्ती ठरले. त्यामुळे मंगल कार्यालय संचालकांवर वाईट वेळ आल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शहरातील मंगल कार्यालयात क्षमतेच्या ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्या अथवा मंगल कार्यालय संचालकांना आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मंगल कार्यालय संचालकांनी नायब तहसीलदार संजय राठोड यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन पाठविले. मंगल कार्यालय बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही. ग्रामीण भागात लग्न कार्य होतच आहेत. मोर्चे आणि इतर समारंभदेखील मोठ्या संख्येने होत आहेत. मात्र शहरातील मंगल कार्यालयावर कडक निर्बंध का आहे, असा प्रश्न आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, लॉज, बस यांमध्ये ५० टक्के मर्यादा निश्चित करून परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर मंगल कार्यालयालासुद्धा क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत योग्य काळजी घेऊन लग्न कार्य किंवा इतर समारंभाला परवानगी द्यावी अथवा आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना विविध मंगल कार्यालयांचे संचालक उपस्थित होते.