घाटंजी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.
कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यास कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत अध्यादेश काढावा, केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावे, सोयाबीन, कापूस व अन्य पिकांची विम्याची रक्कम त्वरित द्यावी, आणेवारीनुसार दुष्काळाच्या सवलती व कर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्ज पुनर्गठन करावे, आदी माग्ण्या करण्यात आल्या.
याशवाय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ योजनेंतर्गत २००९ ते २०१६ पर्यंतची कर्जमाफी पूर्णतः निकालात काढावी, ही मागणीही करण्यात आली. येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे याच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले. नंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डी.एम. राठोड यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी मोरेश्वर वातीले यांनी सरकारच्या धोरणावर आसुड ओढत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आंदोलनात युवराज आडे, सूरज टेकाम, सोपान पंधरे, अशोक देवतळे, सय्यद सरफराज, महेंद्र कांबळे, अनंत सोनडवले, हरिदास खोब्रागडे, भगवान बन्सोड, मधुकर सातपुडके, विलास तोडसाम, रामेश्वर मडावी, प्रेमानंद उमरे, विनायक नगराळे, सचिन राठोड, दीक्षांत वासनिक, सूरज रामटेके, साहिल रामटेके, गौरव शेंडे, यशवंत भगत, रा.वि. नगराळे, नरेंद्र भगत, नंदकुमार देवतळे आदींसह शेतकरी सहभागी होते.