यवतमाळ : गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने जलसाठ्यात अद्यापही वाढ झाली नाही. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०.२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. जुलैपर्यंत ३८८ मिली मीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १६८ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक तालुक्यांनी शंभरीसुध्दा गाठली नाही. पुसद, उमरखेड, महागव येथे सर्वात कमी पाऊस झाला आहे. मारेगाव, वणी, राळेगाव, यवतमाळ, नेर बाभुळगाव येथे अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस पडला आहे. तर दिग्रस, दारव्हा, आर्णी, कळंब, केळापूर, घाटंजी, झरी येथे सरासरी १५० ते २०० मिली मिटर पाऊस झाला आहे. तीन दिवसापासून पाण्याची रिपरिप सुरू असली तरी विशेष जोर नाही. रात्रंदिवस पाऊस सुरू असूनही २४ तासात केवळ १० ते १५ मिमी इतकीच नोंद झाली आहे. त्यामुळेच २४६ पाझर तलाव, ६९ सिंचन तलाव, ३ साठवण तलाव आणि ४७ गावतलाव कोरडे आहेत. नदी, नाल्यांना अजुनही पूर गेलेला नाही. अशीच स्थितीत मध्यम आणि लघु प्रकल्पांची आहे. पुस प्रकल्पात केवळ १८.१२ टक्के साठा आहे. अरूणावती १३.६६, बेंबळा २३.२९, सायखेडा ४१.८०, गोकी २१.३५, वाघाडी २७.४२, बोरगाव २७.९९, लोअर पूस ४९.४२, अडाण ८.३१, नवरगाव २५.९९ टक्के इतका पाणीसाठा आहे. अडाण प्रकल्पात तर मृत साठाच शिल्लक राहीला आहे. जुलै मध्यापर्यंत मागील वर्षी याच प्रकल्पांमध्ये सरासरी ६० ते १०० टक्के पाणीसाठा होता. पाऊस पुढे लांबला नाहीतर बहुतांश प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा राहणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मागच्या वर्षी अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्पामध्ये पातळी दिसत आहे. यंदाच्या पावसाने त्यात कोणतीच भर घातली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
अद्याप जिल्ह्यातील जलाशयात ठणठणाट
By admin | Published: July 23, 2014 12:12 AM