वणी (यवतमाळ) - ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांच्या बाळाचं अपहरण करणा-या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अवघ्या पाच तासांत पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे. अपहरणकर्त्याला आंध्र प्रदेशच्या आसिफाबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बुधवारी (8 नोव्हेंबर) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरी गेल्याची घटना समोर आली. घडलेल्या या घटनेने रुग्णालय प्रशासन हादरले होते. नुसरत जमीन अब्दुल गफ्फार (23) या महिलेने सोमवारी पहाटे गोंडस बाळाला जन्म दिला.
बुधवारी पहाटे रुग्णालयातील वॉर्डमध्ये सर्वजण झोपलेले असताना अज्ञात व्यक्तींनी नुसरत जबीन या महिलेचे बाळ चोरी केलं. नुसरत ही मूळची वणी येथील रहिवासी असून दीड वर्षापूर्वी तिचा विवाह हिंगणघाट येथील अब्दुल गफ्फार शेख या युवकाशी झाला होता. नुसरत पहिल्या बाळंतपणासाठी वणी येथे माहेरी आली होती. यानंतर वणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या अवघ्या पाच तासांत आवळल्या.
आरोपी व बाळ आंध्र प्रदेशातील आसिफाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार वणी पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशकडे रवाना झाले व आरोपीला अटक केली.