एसीएफ-आरएफओ नियंत्रणाबाहेर : डीएफओच्या अज्ञानाचा फायदायवतमाळ : यवतमाळ वनवृत्तात जोडमोहा हे सर्वाधिक बदनाम झालेले वनपरिक्षेत्र आहे. येथील एसीएफपासून वनरक्षकापर्यंत सर्वच अधिकारी-कर्मचारी अवैध वृक्षतोडीत गुरफटले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण असलेले डीएफओ नॉनकरप्ट असले तरी त्यांचा अनुभव कमी पडतो आहे. त्याचाच फायदा घेऊन जोडमोहाची यंत्रणा थेट सागवान तस्करांशी साखळी करून जंगल साफ करीत आहे. जोडमोहातील ही वृक्षतोड आता यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांच्यासाठी आव्हान ठरली आहे. ही वृक्षतोड गुरमे यांनी थांबवून दाखवावी किंवा दोषी एसीएफ ते वनरक्षकांवर थेट फौजदारी करावी, असा सूर वन खात्यातूनच ऐकायला मिळतो आहे. जोडमोहातील याच वन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताने एका ट्रस्टच्या तब्बल दीडशे सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड करण्यात आली. त्याला नंबर वन दाखविण्यासाठी बोगस हॅमरही मारले गेले. हे प्रकरण ट्रस्टींनी थेट कळंबच्या पोलीस ठाण्यापर्यंत नेले होते. मात्र त्यात ‘दलाली’ झाल्याने दोषींना हातकड्या लागू शकल्या नाही. सीसीएफ गुरमेंनी या ट्रस्टींना विश्वासात घेतल्यास तस्करांच्या दावणीला बांधलेल्या या वन अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडण्यास वेळ लागणार नाही. विशेष असे यापूर्वीचे बोगस हॅमरचे प्रकरणही असेच गुंडाळण्यात आले. जोडमोहा वनपरिक्षेत्रातील सागवान तस्कर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यातील सलोख्याचे सबंध सर्वश्रृत आहेत. यापूर्वीसुध्दा नांझा येथील प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. मात्र उपवनसंरक्षक कार्यालयातून या अधिकाऱ्याला पाठबळ मिळत आहे. त्यामुळेच आतापर्यंत झालेल्या कारवाईत थेट मुळापर्यंत जाण्याऐवजी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा बळी घेण्यात आला.वनविभागाच्या रेकॉर्डवरच असलेले तस्कर गणेशवाडी प्रकरणात आहेत. ट्रस्टच्या आणि महसुलाच्या जागेतून १५० सागवान झाडांची तोड करण्यात आली आहे. हा माल मालकीच्या जागेतील दाखवून बोगस हॅमरच्या आधारे पासिंग करण्यात आला. यातील केवळ चार घनमीटर माल वनकर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. यात वापरण्यात आलेले ट्रक आणि ट्रॅक्टर जाणीवपूर्वक सोडून देण्यात आले. ट्रस्टच्या मालासोबतच महसुलाच्या जागेतही मोठी तोड केली आहे. मात्र थेट वनविभागातील अधिकारी यात गुुरफटलेले असल्याने ठोस करावाई होताना दिसत नाही. सागवान तस्करी पेक्षाही बोगस हॅमरचा वापर कसा झाला याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी वाकी-दुधाणा आणि नांझा येथून बोगस हॅमर लावून लाखो रुपयांच्या सागवान तस्करीचे प्रकरण उघडकीस आले होते. (कार्यालय प्रतिनिधी)
सीसीएफ साहेब, जोडमोहातील अवैध वृक्षतोड थांबवून दाखवा
By admin | Published: September 16, 2015 3:04 AM