पाणीटंचाई तीव्र : दोन दिवसाआड पाणीपुरवठापुसद : अपुऱ्या पावसाचे चटके पुसद शहराला असून शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवसआड पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. असाच उद्रेक रविवारी दिसून आला. इटावा वॉर्डातील शेकडो नागरिकांनी रविवारी सकाळी पुसद-नागपूर मार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. पुसद नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या इटावा परिसरात तब्बल २० हजार नागरिक राहतात. येथील येरावार ले-आऊट व गडदे नगरासह, जुन्या वस्तीतल नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नगर परिषदेने ७ एप्रिलपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शनिवार ९ रोजी इटावावासीयांना पाणी मिळाले नाही. परिणामी नागरिकांनी रविवारी सकाळी ९ वाजता पुसद-नागपूर मार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाची वार्ता कानी पडताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, शहरचे ठाणेदार अनिल कुरळकर, ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे आदींनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. तर नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. मो. नदीम, नगरसेवक अॅड. उमाकांत पापीनवार आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना यापुढे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दीड तासांनी इटावावासीयांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. यापूर्वीदेखील इटावा येथील नागरिकांनी ११ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार मनोहरराव नाईक यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने रविवारी दोन महिन्यानंतर येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला, हे विशेष. (प्रतिनिधी)
पुसद येथे पाण्यासाठी दीड तास रास्ता रोको
By admin | Published: April 11, 2016 2:41 AM