लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना यवतमाळ तालुक्यातील पांढरी येथील एका तरुणाचा पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून बळी गेला. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकºयांनी यवतमाळ-अकोलाबाजार मार्गावर तब्बल चार तास रस्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. पांढरीत असलेली नळ योजना अपूर्ण असल्याने गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.विलास राजेराम राठोड (३८) रा. पांढरी असे मृत तरुणाचे नाव आहे. गावात पाणीटंचाई असल्याने तो पत्नी रुपालीसह रविवारी सकाळी एक किलोमीटर अंतरावरील शेतातील विहिरीवर गेला. या विहिरीवरून पाण्याची एक खेप घेऊन रुपाली घराकडे गेली. इकडे विलासचा पाणी काढताना तोल गेला आणि तो विहिरीत पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा विहिरीतच मृत्यू झाला. शेतकरी नामदेव राठोड यांच्या शेतातील या ३५ फूट खोल विहिरीत फक्त तीन फूटच पाणी होते. पत्नी घरुन विहिरीवर आली असता तिला पती दिसला नाही. विहिरीत डोकावून बघितले असता तो पाण्यात पडलेला दिसला. तिने आरडाओरडा केली असता गावकरी धावून आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. विलासकडे तीन एकर जमीन असून त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे.चार वर्षातील पाणीटंचाईचा पांढरी येथील हा दुसरा बळी होय. चार वर्षापूर्वी लग्नाला दीड महिना झालेल्या लक्ष्मी दिनकर उगले या विवाहितेचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला होता.पाणीटंचाईमुळे गावात अशा घटना घडत असल्याने गावकरी संतप्त झाले. विलासच्या मृत्यूने संतप्त झालेल्या गावकºयांनी यवतमाळ-अकोलाबाजार मार्गावर सकाळी १०.३० वाजता रस्ता रोको सुरू केला. रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून टायर पेटविले. यावेळी गावकºयांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. दोनही बाजूची वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच नरेंद्र मोदी विकास मंचचे संजय शिंदे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धनराज चव्हाण, तहसीलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी राठोड यांनी भेट देऊन नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.विलासच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी २.३० वाजता गावकºयांनी आंदोलन मागे घेतले. यवतमाळ ग्रामीण व वडगाव जंगलच्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.पालकमंत्र्यांचा अडविला होता ताफाशनिवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री मदन येरावार कोळंबी येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी पांढरी येथील नागरिकांनी येरावार यांचा ताफा अडवून पाण्याची समस्या सांगितली. ना. येरावार यांनी नागरिकांच्या भावनेचा सन्मान करीत लगेच एका तासानंतर दुपारी २ वाजता घोडखिंडी येथील तलावातून पाईपलाईनद्वारे गावालगतच्या विहिरीत पाणी सोडले. त्या विहिरीतील गावकºयांनी पाणी भरले. विहिरीत पाणी सोडल्यामुळे नागरिकांची एकच गर्दी झाली होती.दहा वर्षांपासून भीषण पाणीटंचाईयवतमाळ तालुक्यातील पांढरी येथे गत दहा वर्षांपासून नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहे. आठ वर्षापूर्वी येथे ३२ लाख रुपयांची नळ योजना मंजूर झाली होती. कामालाही सुरुवात करण्यात आली. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने ही योजना अर्धवट आहे. नळ योजनेच्या विहिरीलाच मुळात पाणी कमी आहे. ही विहीर चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
पांढरीत टंचाईचा बळी गावकऱ्यांचा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 9:54 PM
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना यवतमाळ तालुक्यातील पांढरी येथील एका तरुणाचा पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून बळी गेला.
ठळक मुद्देतरुण विहिरीत पडला : तब्बल चार तास वाहतूक ठप्प