विजेचा प्रश्न : पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागेहिवरी : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने आणि भारनियमनाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता यवतमाळ-आर्णी मार्गावरील अर्जुना येथे रस्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. पालकमंत्री संजय राठोड यांनी या आंदोलनात मध्यस्थी केल्याने आणि दोन दिवसात वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती.वाघाडी सबस्टेशन अंतर्गत मनदेव फिडरमधील कृषीपंप भारनियमनाचे वेळापत्रक बदलविण्यात आले. त्यामुळे अर्जुना, मनपूर, किन्ही, बोथबोडन, म्हसोला आदी गावात केवळ एक ते दीड तास वीज पुरवठा होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले. यासंदर्भात त्यांनी वीज वितरणला निवेदन देऊन रस्ता रोको करण्याचा इशारा दिला. मात्र वीज वितरणने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी शुक्रवारी सकाळी परिसरातील शेकडो नागरिक अर्जुना येथे एकत्र आले आणि रस्त्यावर ठाण मांडून बसले. संतप्त नागरिक वीज वितरणच्याविरोधात घोषणा देत होते. दोनही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.पालकमंत्र्यांपुढे शेतकऱ्यांचे नेते अशोक पुरी यांनी पालकमंत्र्यांनी आमच्यासोबत आंदोलन करू नये, तुम्ही स्वत: सरकार आहात, शेतकऱ्यांना न्याय द्या, असे खडेबोल सुनावले. त्यामुळे वातावरण तापले होते. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती संतोष जाधव यांनी केले. यावेळी हिवरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय निवल, अनुप चव्हाण, वाटखेडचे सरपंच राहुल पारधी, अर्जुनाचे विलास सुरोशे, नितीन जाधव, रवी चव्हाण, जितेंद्र जयस्वाल, मंगेश कार, गजू पवार, रामजी राठोड, यशवंत मडावी, भैय्या श्रीवास, मनपूरचे विष्णू फुपरे, सुरेश शिरीकर यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.एल. दोनकलवार, सहायक पोलीस निरीक्षक एस.आर. पंधरे, रवी जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
अर्जुना येथे रास्ता रोको
By admin | Published: November 21, 2015 2:44 AM