शेतकऱ्यांना लाठीमार : तुरी पाठोपाठ भुईमूग खरेदीचाही वांदा लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : तूर खरेदीच्याबाबतीत शासन उदासीनता दाखवत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यातच आता येथील बाजार समितीमध्ये भुईमूग खरेदीचेही वांदे झाल्याने शेतकऱ्यांनी शनिवारी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी संतप्त शेतकऱ्यांना लाठीने मारहाण केली. सध्या आर्णी बाजार समितीच्या आवारात भुईमुगाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परंतु त्या तुलनेत बाजार समितीकडून तातडीने खरेदीची प्रक्रिया केली जात नाही. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या खरेदीमुळे शेतकरी संतपलेले आहे. त्यातच शनिवारी सकाळी भुईमुगाची खरेदी अत्यल्प काळ चालली आणि नंतर मात्र बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. खरेदी सुरू करा या मागणीसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन बराच वेळ झाला तरी शमण्याची चिन्हे नव्हती. त्यामुळे अखेर पोलीस ताफा आंदोलनस्थळी पोहोचला. शेतकऱ्यांची समजूत काढून रास्ता रोको आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी करून पाहिला. परंतु शेतकरी ऐकायला तयार नव्हते. अखेर शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी त्यांना लाठीने मारहाण केली. या लाठीहल्ल्यानंतरच वाहतूक सुरळीत करणे पोलिसांना शक्य झाले. बाजार समितीमध्ये तूर आणि भुईमूग मोठ्या प्रमाणात आल्याने मार्केट यार्डात आता जागाच शिल्लक नाही. खरेदी अत्यंत धिम्यागतीने होत आहे. व्यापारी वर्ग खरेदीसाठी इच्छुक दिसत नाही. त्यामुळे आर्णीतील परिस्थिती स्फोटक बनली आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांची बोलणी सुरू असून, उद्या रविवार असूनही खरेदी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे तहसीलदार सुधीर पवार यांनी सांगितले.
आर्णी बाजार समितीत रास्ता रोको
By admin | Published: May 28, 2017 12:49 AM