लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यातील करणवाडी येथे मोठ्या प्रमाणा त अवैध दारू विक्री सुरू आहे. यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. दारूबंदीसाठी वारंवार निवेदने व विनंत्या करूनही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी वणी-यवतमाळ मार्गावर मंगळवारी चक्काजाम आंदोलन केले.गावात एकाच व्यक्तीकडून अवैध दारू विक्री सुरू आहे. ती तत्काळ थांबवावी, अशी मागणी करूनही प्रशासकीय यंत्रणा प्रतिसाद देत नाही. या अवैध दारू विक्रीमुळे लहान मुलांमध्येही व्यसनाधिनता वाढत आहे. संतापलेल्या ग्रामस्थांनी व महिलांनी चक्का जाम केला. तब्बल तासभर येथील वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार विजय साळवे, ठाणेदार दिलीप वडगावकर, गटशिक्षणाधिकारी स्नेहलता आंबेकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, गजानन किन्हेकार, माजी जिल्हा परिषद सदस्य आशीष खुलसंगे यांनी केले. यावेळी राजू खडसे, गजानन लेडांगे, मधुकर वरडकर, तुकाराम वाघाडे, गोपाल खामनकर, सुवर्णा खडसे, अनिता बदखल, विशाल किन्हेकर, विजय मेश्राम यांच्यासह शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
करणवाडीत दारूबंदीसाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 11:52 PM