बाजार समिती विरोधात निदर्शने : व्यापार्यांनी भुईमुगाचे भाव पाडलेआर्णी : येथील बाजार समितीमध्ये दोन दिवसापासून शेतकरी मुक्कामी आहे. नवीन बाजार समितीच्या यार्डात व्यापार्यांचा माल शेडमध्ये असून शेतकरी उघड्यावर माल टाकत आहे. तुरळक पावसाच्या सरीने शेंगा ओल्या झाल्यानंतर व्यापार्यांनी बुधवारी दुपारी हर्रास न करता भुईमूगाचे भाव पाडले. तब्बल दहा किलोची कट्टी घेणार असल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर ठिय्या दिला.निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत शेतकरी यावर्षी कसा तरी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. खरीप आणि रबी हंगामात शेतकर्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याची तीव्रता कमी करण्यासाठी उन्हाळी भुईमूगाची लागवड केली. त्यावरही वातावरणाची अवकृपा झाली होती. आता बाजारपेठेत शेंगा घेऊन आलेल्या शेतकर्याला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न व्यापारी व बाजार समिती व्यवस्थापनाकडून केला जात आहे. तालुक्यातील दाभडी, तेंडूळी, जवळा, दत्तरामपूर, सातारा येथील शेतकरी दोन दिवसापासून शेंगा घेवून मुक्कामी आहे. शेडमध्ये व्यापार्याचा माल असल्याने या शेतकर्यांना उघड्यावरच शेंगा टाकाव्या लागल्या. वेळेवर हर्रास सुरू झाला नाही. तितक्यातच पावसाच्या सरी कोसळल्या हीच सबब पुढे करत शेंगा ओल्या झाल्या म्हणून क्विंटल मागे दहा किलोची कट्टी द्यावी लागेल, अशी भूमिका व्यापार्यांनी घेतली. त्यानंतरही दुपारपर्यंत हर्रास सुरू झालाच नाही. शेवटी शेतकर्यांच्या संयमाचा बांध फुटला. पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या मुरडल्या जात असल्याचे लक्षात येताच हतबल शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तुळजापूर मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. या दाभडीतील सरपंच संतोष टाके, अतुल मुनगिनवार, दीपक गायधने, गणेश राठोड, सुनील नागोसे, जयंत पाटील, साखरकर, दिगांबर राठोड, मनोज चव्हाण, रमेश आडे, अतुल चव्हाण यांच्यासह बाजार समितीत असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरून बाजार समिती प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत होते. आर्णी बाजार समितीत शेतकर्यांना लुटण्याचेच काम सुरू आहे. येथे व्यवस्थापनाकडूनही व्यापार्यांचीच बडदास्त ठेवल्या जाते. अनेक महिन्यांपासून शेडमध्ये असलेला व्यापार्यांचा माल खाली करण्याची तसदी बाजार समिती प्रशासनाने घेतली नाही. त्यांच्या या मनमानीमुळेच शेतकर्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. परिणामी पाऊस आल्यानंतर तेच व्यापारी शेतकर्यांच्या मालाला कवडीमोल दरात खरेदी करण्याची भाषा करत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना आंदोलनाचा पवित्रा घेण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. मोठय़ा संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत असताना त्यांची समजूत काढण्यासाठी पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. मात्र या संदर्भात चर्चेतून वृत्त लिहेपर्यंत तरी कोणताही तोडगा निघाला नव्हता. शेंगा ओल्या झाल्याचे कारण पुढे करत शेतकर्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न व्यापार्यांकडून सुरूच होता. (तालुका प्रतिनिधी)
आर्णी येथे शेतकर्यांचा रास्ता रोको
By admin | Published: June 05, 2014 12:02 AM