पुसदमध्ये वाहतूक ठप्प : दारव्हा येथे वाहनधारकांशी शाब्दीक वाद पुसद/दारव्हा/हिवरी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन शनिवारी ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला. पुसद, दारव्हा, भांब येथे झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी शिवसैनिकांना स्थानबद्ध केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी ही शिवसैनिकांची प्रमुख मागणी होती. पुसद येथील छत्रपती शिवाजी चौकात दुपारी २ वाजतापासून अर्धातास रास्ता रोको करण्यात आला. शहर व तालुका शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख उमाकांत पापीनवार, तालुका प्रमुख विकास जामकर, राजेंद्र साकला, रवी पांडे, मधुकर कलिंदर, संतोष हरणे, कैलास मस्के, विशाल पेंशनवार, अर्जुन राठोड, विश्वंभर पाटील, सूर्यभान चव्हाण, राजू महाजन, पंचायत समिती सदस्य गणेश पागिरे, विष्णू शिकारे, मनोज देवकुळे, संदीप बाबर, स्वाभिमानी संघटनेचे विश्वजित लांडगे, संजय पोटे, दीपक उखळकर, उत्तमराव खंदारे, विलास काळे, भाऊराव पागिरे, राजू वंजारे, साहेबराव साखरे, बाबाराव अंभोरे, रवी इनामे, बबन देशमुख, सोपीनाथ पाटील, अंबादास तास्के, सोपीनाथ माने, अरुण पवार आदी उपस्थित होते. या सर्वांना स्थानबद्ध करण्यात आले. दारव्हा येथे गोळीबार चौकात चक्काजाम करण्यात आला. दुपारी ३ वाजता शिवसैनिकांनी अचानक आंदोलन सुरू केले. त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. येथील शिवसेना कार्यालयातून विविध घोषणा देत हे शिवसैनिक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. पोलीसही याबाबत अनभिज्ञ होते. अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे काही वाहनधारकांसोबत शिवसैनिकांचा शाब्दीक वादही झाला. तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख सुधीर दातीर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. नगराध्यक्ष बबनराव इरवे, नगरपरिषद सभापती प्रकाश दुधे, गजेंद्र चव्हाण, रवी तरटे, नगरसेवक अरुण निंबर्ते, प्रकाश गोकुळे, शरद गुल्हाने, पंचायत समिती सदस्य पंडित राठोड, नामदेव जाधव आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. आर्णी मार्गावरील भांब येथे सकाळी ९ वाजता शिवसेनेने रास्ता रोको केला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख किशोर इंगळे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांसह नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना स्थानबद्ध करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न झाल्यास जिल्हा बंदचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनामध्ये भांबच्या सरपंच शुभांगी ब्राम्हणे, उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे, योगेश वर्मा आदी सहभागी झाले होते. (लोकमत चमू)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेतर्फे रास्ता रोको
By admin | Published: March 12, 2017 12:51 AM