कोट्यवधींचे पीक नुकसान : जनावरेही दगावली, वीज पुरवठा खंडीत, घरांवर झाडे कोसळली, रस्ते बंद शिवानंद लोहिया हिवरी हिवरी-अकोला बाजार सर्कलमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांची कोट्यवधींची हानी झाली. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटल्या गेला. हिवरी-अकोला बाजार परिसरातील सर्कलमधील अकोला बाजारसह, माजर्डा, बोरी सिंह, सायखेडा खु., रूई-वाई, वाटखेड, हिवरी, नाकापार्डी आदी गावांना या गारपिट वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसल्याचे दिसून आले. गहू, हरभरा ही पिके अक्षरक्ष: पावसाने झोपली. जनावरे दगावली, टिनपत्रे उडाली. पपई, केळी, मका, टमाटर, टरबूज, काकडी, वांगे आदी पिके नष्ट झाली. कांदा, चवळी व इतर भाजीपाला पिके जमिनोदोस्त झाली. बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला आलू ओला झाला. पिकांसोबतच काही गावातील जनावरे दगावली तर अनेक ठिकाणी घरांवर, वाहनांवर झाडे कोसळली. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने काही मार्ग बंद झाले होते. अकोला बाजारहून सालोडला जाणाऱ्या मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने हा मार्ग बंद झाला होता. तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने या सर्व गावातील वीजपुरवठा कालपासूनच खंडीत झाला आहे. अकोला बाजार येथील संतोष अग्रवाल यांच्या शेतातील गहू व हरभऱ्याचे पूर्ण पिक गारपिटीमुळे जमिनोदोस्त झाले आहे. सुरेंद्र जगताप, नरेंद्र जगताप, गुलाबचंद अग्रवाल, जितेंद्र जगताप, संध्या जगताप, रामभाऊ कराळे व ओमप्रकाश कराळे आदींसह अनेकांच्या शेतातील उभे पिके नष्ट झाली. अकोला (बा.) येथील गिरीश जगताप यांची जरशी गाय गारांमुळे मृत्युमुखी पडली. बोरीसिंह येथील अनिल चांडक, किसन बैरम, संकेत धुरड, अशोक लेकुळे, प्रवीण चांडक आदींसह शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील गहू-हरभरा नष्ट झाला. तसेच याच गावातील चार ते पाच जनावरे मरून पडली. बोरीसिंह येथील गजानन इंगोले यांच्या ट्रॅक्टरवर झाड कोसळले तर वृद्ध महिला चंदा हुलकुंडे यांच्या घरावर झाड कोसळले. सायखेडा येथील भगवान पिंपळकर यांच्या घरावर मुळासह झाड कोसळले त्यात बैलबंडीही दबली. येथीलच संजय शिंदे पाटील यांच्या शेतातील शेट-नेट पूर्णपणे नष्ट झाल्याने त्यांचे काकडी पिकांसह १५ लाखांचे नुकसान झाले. याचसोबत सायखेडा येथील केशव टाले, अनंत टाले, संदीप टाले, शरद टाले, निळकंठ जोगदंड, श्रीराम लढे, गजानन इंगोले, छत्रपती इंगळे, देवानंद तोटे, लक्ष्मण कोल्हे, प्रभाकर आराम, नामदेव धुर्वे, वासुदेव कोल्हे आदींसह अनेक शेतकऱ्यांचे पिके नष्ट झाली. वाई येथील राजाराम काळे यांची चार एकर केळीच्या बागेला गारपिटीचा चांगलाच फटका बसला. जवळपास आठ लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. वाटखेड येथील अनिल कोठडिया यांच्या पपईच्या बगिच्यालाही मोठा फटका बसला असून १०० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. हिवरी येथील अमोल मेहर यांचे नऊ एकरातील मका पिक, किरण ससनकर, भरतसिंग मेहर, किशोर सरोदे, विठोबा कोडापे, ओंकार कुमरे व इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नेस्तनाबूत झाली. या सर्व गावांना शुक्रवारी सकाळपासूनच भाजपा नेते संजय शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य रेणू संजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही गावांना तहसीलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, तालुका कृषी अधिकारी भवरे, मंडळ कृषी अधिकारी राठोड यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मी गुरुवारी सायंकाळीच पालकमंत्री मदन येरावार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच नुकसानीचे फोटोसुद्धा त्यांना पाठविले. त्यांनी सबंधित शासकीय यंत्रणेकडून नुकसानीचा सर्व्हे करून चोविस तासात अहवाल मागितला असल्याचे आपल्याला सांगितले. आज सकाळपासूनच मी सर्कलमधील बहुतांश गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. - रेणू संजय शिंदे (पाटील), जिल्हा परिषद सदस्य, हिवरी-अकोलाबाजार सर्कल
हिवरी-अकोलाबाजार सर्कलमध्ये वादळाचा तडाखा
By admin | Published: March 18, 2017 12:48 AM