टिनपत्रे उडाली : महागाव तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस महागाव : तालुक्यातील करंजखेड येथे गुरूवारी सायंकाळी आलेल्या प्रचंड वादळाने अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली असून, काही नागरिक किरकोळ जखमी झाले. दिवसभर पावसाचा जोर आणि सायंकाळी झालेल्या वादळाने गावात एकच खळबळ उडाली आहे. महागाव तालुक्यात गुरूवारी सकाळपासून धुंवाधार पाऊस सुरू आहे. त्यातच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करंजखेड येथे जोरदार वादळ झाले. या वादळात रामराव राठोड, पुनाजी जाधव, प्रेमदास चव्हाण, मंदिर राठोड, संदीप आडे, विलास जाधव, परसराम राठोड, विजय राठोड, बळीराम राठोड, विनोद राठोड, सवाई राठोड, गजानन भांगे, दीपक भांगे यांच्यासह अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेली. टीनपत्र्यांवरील दगड घरात कोसळल्याने काही लोकांना किरकोळ दुखापत झाली. या वादळाने एकाच हल्लकल्लोळ झाला असून, वरून पाऊस आणि वादळ अशा दुहेरी संकाटात गावकरी सापडले होते. त्यातच गावानजीकच्या नाल्यालाही मोठा पूर आला आहे. गावकऱ्यांंच्या मदतीसाठी सरपंच प्रवीण ठाकरे यांच्यासह अनेक जण धावून गेले आहे. नेमके नुकसान किती झाले हे मात्र कळु शकले नाही. (शहर प्रतिनिधी)
करंजखेडला वादळाचा तडाखा
By admin | Published: September 18, 2015 2:27 AM