यवतमाळ : जिल्हा पाेलिस दलाची आस्थापना सांभाळणाऱ्याचे दैनंदिन कामात प्रचंड दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी मृत्यू झालेल्या शिपायाला सतत गैरहजर असल्याने थेट आज्ञांकित कक्षात उपस्थित राहण्याचे फर्मान साेडण्यात आले. या अजब प्रकारामुळे दराटी ठाणेदारही काही वेळ चक्रावले. मयत शिपायाला आणायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला. वर्षभरापूर्वी मृत्यू झालेल्या शिपायाची नाेंद ठेवता येत नाही, यावरून बाबुगिरीचे आणखी काय प्रताप असतील याची प्रचिती येते.
बिनपगारी रजेवर असलेल्यांचा अहवाल तयार करण्यात आला. अशा शिपायांना तत्काळ आज्ञांकित कक्षात म्हणजेच जिल्हा पाेलिस अधीक्षकापुढे उपस्थित राहण्याची सूचना बिनतारी संदेशाद्वारे संबंधित ठाणेदार देण्यात आली. हा आदेश १७ जुलैला वायरलेसद्वारे प्रसारित करण्यात आला. यात एकूण १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात दाराटी येथील शिपायाचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्याचेसुद्धा नाव या यादीत समाविष्ट केले आहे. बक्कल नंबर २३१७ असलेला हा शिपायी अमाेल ठाकरे आहे. त्यांना १८ जुलैला सकाळी १० वाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले हाेते. यावरून थेट मुख्यालयातील माहिती अद्ययावत हाेत नसल्याचे दिसून येते. ही गंभीर चूक लक्षात आल्यानंतर सावरासावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पाेलिस कर्मचाऱ्यांना जेरीस आणणारी यंत्रणा म्हणून हे प्रसिद्ध आहेत. त्याच्याकडे काेणतेच काम चकरा घातल्या शिवाय पूर्ण हाेत नाही. प्रशासकीय कामासाठी अनेकांना कार्यालयीन वेळेत येथे यावे लागते. वारंवार याच्या तक्रारी हाेतात. त्यानंतर या यंत्रणेला घाम फुटत नाही. प्रशासन काेणाचेही असाे काम आमच्यास पद्धतीने चालेल असा या यंत्रणेचा हेका आहे. आतातर पूर्ण वेळ अधीक्षकही उपलब्ध नाही. त्यांच्या आस्थापनेवर रिक्त पद असल्याने आणखीच गाेंधळाची स्थिती निर्माण हाेते. यात सामान्य पाेलिस कर्मचारी भरडला जाताे.
रिक्त पदांचाही जाच
पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता डोकेदुखी आहे. याच प्रमाणे लिपिकवर्गीय यंत्रणेवरही अतिरिक्त कामाचा ताण आहे. येथील पदनिर्मिती व भरती अनेक वर्षांपासून रखडली आहे.