यवतमाळ : शासकीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेतच आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त असतात. बरेचदा हे कर्मचारी व त्यांचे वरिष्ठही सवडीने कार्यालयीन कामकाज करताना दिसून येतात. हा प्रकार थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग येथे अचानक भेटी दिल्या. यावेळी ३३ दांडीबहाद्दर आढळून आले. या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्याची सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचा आदेश दिला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ मध्ये तब्बल २६ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नव्हते. यामध्ये मुख्य आरेखक, आरेखक, कनिष्ठ अभियंता २, विस्तार अधिकारी सांख्येकी १, वरिष्ठ सहायक ७, कनिष्ठ सहायक ९, परिचर ५ यांचा समावेश होता. जवळपास संपूर्ण ऑफिसच रिकामे असल्याचे चित्र सीईओंना दिसले. त्यानंतर जिल्हा आराेग्य अधिकारी कार्यालयात सहायक साथरोग अधिकारी, प्रधानमंत्री मातृत्व योजना, आरोग्य सेवक कुटुंब कल्याण, वरिष्ठ सहायक २ कार्यालयीन वेळेत उपस्थित नव्हते. कृषी विकास अधिकारी कार्यालयात सहायक लेखा अधिकारी व कनिष्ठ सहायक न सांगताच बाहेर गेलेले आढळून आले.
या सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांच्याकडून २० एप्रिलला लेखी जबाब घेण्यात आला. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी असमाधानकारक उत्तर दिले. त्यामुळे यांच्यावर कारवाई निश्चित झाली. सर्वांचे एक दिवसाची विनावेतन रजा करण्यात आली. हे कर्मचारी भविष्यातही कार्यालयीन वेळेत गैरहजर आढळल्यास त्यांना प्रशासकीय बदलीत कोणताही विकल्प घेता येणार नाही. त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. या सर्व बाबींची या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे.
कार्यालयीन वेळेत टपरीवर
या कठोर कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी वेळेत कार्यालयात राहतील अशी आशा निर्माण झाली आहे. बहुतांश कार्यांलयात वेळेत कुणीच उपस्थित नसते. ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वारंवार परत पाठविले जाते. बहुतांश कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन वेळ चहा कॅन्टीनवरच जातो. महिला वर्ग शासकीय कार्यालयातच विविध वस्तूंची खरेदी करण्यात गुंतलेल्या दिसतात. कार्यालयीन परिसरात साड्या व खाद्यपदार्थ विकणारे फिरतातच कसे हाही एक प्रश्न आहे.