खावटी सुरू करा : भूमिहीन आदिवासींना घरे आणि शेतजमिनीचे पट्टे द्याराळेगाव : खावटी त्वरित सुरू करावी, पांढरकवडा प्रकल्प कार्यालयात आयएएस प्रकल्प अधिकाऱ्याची नेमणूक करावी, आश्रमशाळेत कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, भूमिहीन आदिवासींना घरे आणि शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांनी येथील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय आणि आगारात धडक दिली. आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. नेतृत्त्व या संघटनेचे जिल्हाध्यक्ष जीवन कुळसंगे, कार्याध्यक्ष गजानन मेश्राम, सी.एस. मेश्राम, श्रीधर सिडाम, संगीता रामपुरे, संजय जुमनाके आदींनी केले. या मोर्चात परिसराच्या विविध गावातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पेसा कायद्यांतर्गत पोलीस पाटील आणि कोतवाल पदावर आदिवासींची निवड करावी, कोलाम पोडावर चावडी देण्यात यावी, वंचित आदिवासींना बीपीएल कार्ड देण्यात यावे, विहिरगाव येथील मच्छी तलाव पेसा कायद्यांतर्गत गावातच देण्यात यावा, झाडगाव-झरगड-लोणी रस्त्याचे नूतनीकरण करावे, झरगड ते वरूड पांदण रस्त्याचे काम सुरू करावे, विहिरगाव कोलाम पोडावर घरकूल, पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी, आदिवासी क्षेत्रात बससेवा सुरू करावी आदी मागण्या या निवेदनात नमूद आहेत. (प्रतिनिधी)
आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा
By admin | Published: September 19, 2015 2:24 AM