माणिकराव ठाकरे : काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा यवतमाळ : काँग्रेस आणि राज्याला नेतृत्व देणारा जिल्हा अशी यवतमाळची ओळख आहे. आता जिल्ह्यातील सर्व नेते-पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद विसरून पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा, त्यासाठी कार्यकर्त्यांनीही बदल स्वीकारावा, असे आवाहन विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती तथा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले आहे. येथील बलवंत मंगल कार्यालयात जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला काँग्रसचे जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके, संजय देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार कीर्ती गांधी, विजय खडसे, विजयाताई धोटे, नंदिनीताई पारवेकर, सेवक वाघाये, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, अकोला येथील हिनायतुल्ला खान, आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, राहुल ठाकरे, देवानंद पवार, डॉ. मोहंमद नदीम, डॉ. वजाहत मिर्झा, संध्याताई सव्वालाखे, जीवन पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, वामनराव कासावार, कीर्ती गांधी, विजय खडसे, संध्याताई सव्वालाखे आदींनी मार्गदर्शन केले. माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना, पक्षश्रेष्ठीकडे पदाबाबत कोणतीही मागणी केली नाही. श्रेष्ठींनी उपसभापतीपदाची जबाबदारी सोपविली आणि मी ती स्वीकारली. मात्र संवैधानिक पदावर असलो तरी पक्षाचे काम सोडणार नाही. केवळ विधीमंडळ परिघातच माझी भूमिका ही उपसभापती म्हणून राहणार आहे. विधीमंडळाबाहेर मी पक्षवाढीचा अजेंडा घेऊनच काम करणार असल्याचे म्हटले. कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील आजीमाजी पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती या मेळाव्यात पहायला मिळाली. बऱ्याच अवधीनंतर पक्षाचा कार्यक्रम झाल्याने अनेकांनी येथे हजेरी लावली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तातू देशमुख यांनी तर संचालन अरुण राऊत यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी) ‘लोकमत’ची दखल : रेखाला मदतीचा हात उमरखेड तालुक्यातील मोरचंडी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील रेखा रणजीत खचकड या विद्यार्थिनीचा एमबीबीएस प्रवेश आर्थिक अडचणीमुळे धोक्यात आला होता. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर तिच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला. काँग्रेसच्या मेळाव्यात देवानंद पवार मित्रमंडळाने रेखाला ५० हजार रुपयांची मदत केली. त्याचा धनादेश माजी आमदार विजय खडसे यांनी रेखाच्यावतीने या मेळाव्यात स्वीकारला.
मतभेद विसरून पक्ष मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2016 2:11 AM