यवतमाळ : शेतशिवारात रोजमजुरी करीत त्याने शिक्षण घेतले. त्यातून शिक्षकाची नोकरी मिळविली. पुन्हा मेहनत घेत त्याने आता चक्क एमपीएससी परीक्षा सर करून फौजदार होण्याचेही स्वप्न साकार केले आहे. संदीप राजकमल पाटील, असे या गरिबीवर मात करीत यशस्वी होणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
आर्णी तालुक्यातील अंबोडा हे संदीपचे गाव. प्राथमिक शिक्षण गावातल्याच शाळेत घेतल्यावर त्याने कवठाबाजार येथील विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. रोजमजुरी करीत त्याने नागपूर येथून डीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्याआधारे त्याला एका काॅन्व्हेंटमध्ये शिक्षक म्हणून नोकरीही मिळाली; परंतु पोलीस अधिकारीच बनायचे हे त्याचे ध्येय होते. त्यासाठी २०१४ साली त्याने पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली; पण त्यात यश आले नाही.
अपयशाने खचून न जाता त्याने मेहनत वाढविली. २०१९ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत मात्र त्याला यश मिळाले. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, त्याचे पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून त्याला ३८ वा रॅंक मिळाला आहे. या यशाबद्दल वडील राजकमल पाटील आणि भाऊ सुरेंद्र पाटील यांनी संदीपच्या मेहनतीलाच सर्व श्रेय दिले आहे.