अविनाश साबापुरे
यवतमाळ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अद्यापही भटक्या विमुक्त समाजाच्या नशिबातील सामाजिक गुलामगिरी संपलेली नाही. गरीब आणि उपेक्षित असली तरी ही मंडळी अंगभूत कला सादर करण्यात वाकबगार आहे; मात्र त्यांच्या कलेची समाजाला आणि सरकारलाही किंमत नाही. नेमके हेच दुखणे हेरुन यवतमाळातील तरुणाने त्यांच्यावर चित्रपट साकारला आहे. लवकरच तो राज्यभरात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे.
भारत गणेशपुरेसारखा आघाडीचा अभिनेता मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘शोध भाकरीचा’ या सिनेमाची निर्मिती यवतमाळ येथील आनंद कसंबे यांनी केली आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. संपूर्ण चित्रीकरण यवतमाळ शहर व आजूबाजूच्या परिसरात करण्यात आले. अविश वत्सल, विश्वनाथ निळे, प्रा. दिलीप अलोणे, महेश राठोड, प्रा. नारायण चेलपेलवार, गजानन जडेकर, डाॅ. ललिता घोडे, संजय माटे, विलास सुतार, भारत लोहकरे, प्रथमेश डोंगरे, वैशाली येडे, सृष्टी दुर्गे, विलास पकडे, गजानन वानखडे, मनीष शिंदे यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. आनंद कसंबे यांच्यासह सुबोध वाळके यांनी चित्रीकरणाची बाजू सांभाळली.
समाजाने आजवर ज्यांच्याकडे केवळ नाच-गाणे करणारे किंवा कलेच्या आडून चोऱ्या करणारे म्हणून उपेक्षेने पाहिले, त्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील जातीवंत कलावंतांचे प्रत्यक्ष जगणे नेमके कसे आहे, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहरात नाथजोगी समाजातील बहुरूप्याचे सोंग घेतलेल्या तीन कलावंतांना संतप्त समूहाने केवळ संशयातून ठार मारले होते. असेच हत्याकांड बुलडाणा व अन्य शहरांमध्येही अलीकडच्या काळात गाजले. त्याचेही पडसाद या सिनेमात उमटले आहेत.
२५ जातींची लोककला पाहण्याची संधी
दिग्दर्शक आनंद कसंबे गेल्या काही वर्षांपासून भटक्या विमुक्त लोकांच्या अडचणींचा अभ्यास करीत आहेत. त्यातूनच त्यांनी बहुरुपी ही जात केंद्रस्थानी ठेवून ‘शोध भाकरीचा’ सिनेमाची निर्मिती केली. सोबतच किंगरी घेऊन फिरणारा नाथजोगी, रामप्रहरी येणारा वासुदेव, पिंगळा (डमरूवाले), पांगूळ, गोसावी, गोंधळी, मसानजोगी, डोंबारी, लोहार, बंजारा, धनगर, छप्परबंद, बेलदार, वडार, पाथरवट, कहार, गारुडी अशा २० ते २५ जातींची झलक आणि त्यांची लोककला या सिनेमात पहायला मिळणार आहे.
भटके विमुक्त म्हणजे काय?
ब्रिटिश राजवटीत १८७१ चा जन्मजात गुन्हेगारी कायदा अस्तित्वात होता. देश स्वतंत्र झाल्यावरही या कायद्यानुसार भटक्या लोकांना गावकुसाबाहेर एखाद्या मैदानात पाल ठोकून ‘खुल्या कारागृहात’ ठेवले जायचे. त्या मैदानाला काटेरी कुंपण असायचे. गाव प्रमुखाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना कुंपणाबाहेर निघण्यास मनाई होती. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. तेव्हा ३१ ऑगस्ट १९५२ रोजी पंडित जवाहरलाल नेहरुंनी सोलापुरात येवून हे कुंपण तोडले. यावेळी नेहरुजींनी ‘आज से तुम लोग विमुक्त हो गये’ असे उद्गार काढले. कुंपणात असलेल्या १४ जाती विमुक्त झाल्या तर अन्य २८ जाती भटक्या राहिल्या. तेच आजचे भटके विमुक्त. त्यांच्याच जीवनाचा अभ्यास करून आनंद कसंबे यांनी सिनेमा साकारला आहे.
बहुरुपी समाजाचा कलावंत एखादे सोंग घेऊन जेव्हा कुणाच्या घरासमोर येतो तेव्हा त्याला हाकलून लावले जाते. हीच परिस्थिती अन्य समाजातील लोककलावंतांचीही आहे. त्यांचा जीवनसंघर्ष नव्या पिढीला कळावा, दुर्मीळ होत चाललेल्या लोककलांचे दर्शन घडावे म्हणून हा सिनेमा केला.
- आनंद कसंबे, दिग्दर्शक