लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे एसटीचा प्रवास बंद झाला होता. राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केल्यानंतरही प्रवासी बसमध्ये जाण्यासाठी तयार नव्हते. दिवाळीपूर्वी फार कमी गर्दी बसमध्ये होती. मात्र दिवाळी संपताच हे चित्र बदलले आहे. दर दिवसाला ४२ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. यातून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न ३७ लाखांवर पोहोचले आहे. दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे. दरवर्षी पुण्यावरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी दिवाळीपूर्वीच गावी आल्याने एसटीला या उत्पन्नास मुकावे लागले. पुढील काळात एसटी पूर्वप्रमाणेच उत्पन्न वाढेल. हे उत्पन्न ७० लाखापर्यंत जाईल, अशी आशा आहे. कोरोना आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सॅनिटायझरचा स्प्रे बंधनकारक करण्यात आला आहे.
दररोज सॅनिटायझर वाढविण्याची गरजप्रत्येक आगाराने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारणी बंधनकारक आहे. मात्र वाढलेली गर्दी पाहता या नियमाचे पालन होत नाही. बसमध्ये प्रवासी खचाखच भरलेले असतात. अशा परिस्थितीत सॅनिटायझरचा फवारा करताच येत नाही. हा फवारा झाल्यास प्रवसी अधिक सुरक्षित होतील.
फिजिकल डिस्टन्सचा उडतोय बोजवाराबसफेऱ्या कमी आणि प्रवासी जास्त अशा परिस्थितीत बसमध्ये जागा नसल्यामुळे अनेकांना उभे राहात प्रवास करावा लागतो. या परिस्थितीत दोन जागेच्या सीटवर तीन जण बसलेले असतात. कंडक्टरलाही तिकीट काढण्यासाठी दाटीहून पुढे मार्ग काढावा लागतो.
एसटीचा प्रवास सर्वाधिक सुरक्षितराज्य परिवहन महामंडळाने एसटी बस सुरू करताच खासगी वाहनांकडे प्रवास भाडे कमी झाले आहे. सर्वाधिक सुरक्षित सेवा म्हणून प्रवासी एसटीकडे वळले आहे. ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रवासीदिवाळीनंतर माहेरी जाण्यासाठी गृहिणी मोठ्या प्रमाणात प्रवासाला निघाल्या आहे. गावखेड्यातून प्रवासी मोठ्या प्रमाणात शहराकडे आणि जिल्ह्यातील इतर गावांकडे वळले.