यवतमाळ :एसटीचे राज्यभरातील तब्बल १० हजार निवृत्त अधिकारी व कर्मचारी मागील चार वर्षांपासून रजा, वेतनवाढीचा फरक आदी लाभांपासून वंचित आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे २९५ कोटी रुपये देणे थकीत आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत.
संपूर्ण आयुष्य तुटपुंजा पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत गेल्यानंतरही निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहे. मागील चार वर्षांत थकीत देणी मिळण्याअगोदर ७३ पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाला. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.
निवृत्तीनंतरची सर्व देणी तत्काळ देण्याचे परिपत्रक आहे. मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कमही कमी मिळते. त्यातही ही रक्कम थकीत राहिल्याने, निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. काही कर्मचाऱ्यांना कोरोना व इतर आजारामुळे खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यांना औषध उपचारासाठीही थकीत रक्कम कामी आलेली नाही.
याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिने चालला. या कालावधीत निवृत कर्मचाऱ्यांना मोफत पासवर राज्यात कुठेही फिरता आले नाही. निवृत कर्मचाऱ्यांना जो मोफत प्रवासाचा सहा महिन्यांचा पास मिळतो, त्याची मुदतही वाढवून देण्यात आलेली नाही. महामंडळाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सोयी तर दिल्याच नाही. त्यांच्या हक्काच्या रकमेसाठीही त्रास सहन करावा लागत आहे.
निवृत्तांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळू नये, हा त्यांच्यावर अन्याय आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची यावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.