लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध क्षेत्रात, विविध हुद्द्यांवर आणि विविध शहरांमध्ये कार्यरत असतानाही ज्या कॉलेजने आपल्या आयुष्याची दिशा ठरविली त्या कॉलेजचे दिवस विसरणे शक्यच नसते. याचाच प्रत्यय येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या १९९१-९२ च्या अकरावी-बारावीच्या (विज्ञान) तुकडीने आयोजित केलेल्या स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना आला. तब्बल २५ वर्षानंतर एकमेकांना भेटलेले हे वर्गमित्र आणि त्यावेळचे गुरूजन या सोहळ्याने चांगलेच भारावून गेले.अमोलकचंद महाविद्यालयाच्या वसंतराव नाईक सभागृहात रंगलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा होते. प्रमुख म्हणून उपप्राचार्य वानरे, प्रा.गोपीराज पळशीकर, प्रा. ज्ञानेश्वर बोरखडे, प्रा. एस.पी. चौथाईवाले, सी.बी.देशपांडे, प्रा. देशपांडे, प्रा. नागपुरे, प्रा. सिंग, प्रा.फ्लोरा सिंग, प्रा.दुर्गे, प्रा.गुजर, प्रा.व्ही.सी.जाधव, प्रा. कावळे, प्रा.खोडे, प्रा. राजेश कळसकर उपस्थित होते.मुंबई-पुणे-नागपूरपासून तर देशातील विविध शहरांमध्ये कार्यरत असणारे जवळपास ४० माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी यवतमाळात दाखल झाले होते. महाविद्यालय सोडल्यानंतरच्या २५ वर्षात आपण कसे घडत गेलो, महाविद्यालयात असताना कोणाचे कसे मार्गदर्शन मिळाले हे या माजी विद्यार्थ्यांनी मुक्तकंठाने आपल्या मनोगतातून मांडले. दहावीपर्यंतच्या बंदिस्त वातावरणातून बाहेर येऊन महाविद्यालयीन जीवनाची सुरूवात करताना केलेल्या गमती-जमती, त्यावेळचे विविध प्रसंग तब्बल २५ वर्षानंतरही ताजेपणाने त्यांनी विषद केले. कॉलेज जीवनातील त्या आठवणींनी माजी विद्यार्थीच नाही तर तत्कालीन प्राध्यापकवृंदही भूतकाळात रममाण झाले होते. असा सोहळा गेल्या कित्येक वर्षात आपण अनुभवला नाही असे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित प्राध्यापकवृंदांचा या माजी विद्यार्थ्यानी शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन प्राध्यापकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचालन प्रा.गाणार यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनिष वाठ, जयेश सावला, राजा तुरक, प्रशांत गोडे आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. या सोहळ्याला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२५ वर्षानंतरच्या भेटीने भारावले विद्यार्थी अन् शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 9:27 PM
विविध क्षेत्रात, विविध हुद्द्यांवर आणि विविध शहरांमध्ये कार्यरत असतानाही ज्या कॉलेजने आपल्या आयुष्याची दिशा ठरविली त्या कॉलेजचे दिवस विसरणे शक्यच नसते.
ठळक मुद्देस्नेहमिलन सोहळा : देशाच्या कानाकोपºयातून जमले अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी