जब्बार चीनी लोकमत न्यूज नेटवर्क वणी: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबर तळागाळातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. नवीन शाळा खोल्यांची उभारणी, शाळा दुरुस्ती, शौचालयांची उभारणी, दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे यासह मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षण विभाग कोट्यवधी रुपयाचा खर्च या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी करत असते. मात्र त्यानंतरही विद्यार्थी असुरक्षितच आहेत.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३८ तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या दोन शाळा आहेत. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वणी तालुक्यातील ३४ शाळांमध्ये नवीन ४५ वर्गखोली बांधकाम, ५९ शाळेला संरक्षण भिंत, १०३ शाळेत आरओ प्लांन्ट, ८४ शाळेत डेस्क बेंच, २९ शाळेत नवीन शौचालय, तर सात शाळेत शौचालय दूरस्तीची आवश्यकता आहे. शिक्षण विभाग कोट्यवधी रुपयाचा खर्च या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी करत असते. मात्र त्यानंतरही विद्यार्थी असुरक्षितच आहेत. वास्तविक, दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत असताना गेल्या काही महिन्यांपासून रिक्त पदे भरण्याबाबत शासनाची उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे या विभागांवर कामाचा ताण येत आहे. दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अनेक पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे लवकर भरल्यास शिक्षण विभागावरील कामाचा ताण कमी येऊ शकतो. पंचायत समितीमार्फत रिक्त पदांबाबत वारंवार शासनाला माहिती कळवली जाते. तरीही शासनाची त्याकडे डोळेझाक होत आहे.
राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर सन २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९ मध्ये उठली आहे. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती केली नाही. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे. शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष दिले तरच ग्रामीण भागातील शाळा टिकतील.
चित्रकलेसाठी कला शिक्षकच नाही शासनाने पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवीपर्यंतही चित्रकला विषय अनिवार्य केला आहे. मात्र, चित्रकलेसाठी कला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सन २०१३ पासून शासनाने कला शिक्षकांची भरती बंद केली आहे. एकीकडे एटीडीचे शिक्षण चालू असून दुसरीकडे कल क्षेत्रातील पदभरती बंद केल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. चित्रकला विषयासाठी शिक्षकांची गरज आहे.
पालकांची विचारसरणी व मानसिकता बदलली पूर्वी जिल्हा परिषद शाळा ही शिक्षणाचा आत्मा म्हणून ओळखला जायचा. पण त्याच जिल्हा परिषदेच्या शाळावर आजचा घडीला शेवटची घटका मोजण्याची वेळ आली आहे. याला मुख्य कारण म्हणजे पालकांची बदललेली विचारसरणी. कारण प्रत्येक पालकांना आपले पाल्य इंग्रजी मीडियमच्या शाळेत पैसे खर्च शिकवायचे असते.
वणी तालुक्यात शिक्षकांची ८४ पदे रिक्त वणी तालुक्यात शिक्षकांची ४४५ पदे मंजूर आहेत. त्यातील ८४ पदे रिक्त आहे. सध्या प्रभारी कारभार चालू आहे. शिक्षण विस्तार अधिकारी सहा पदे मंजूर आहेत. पैकी चार रिक्त आहे, दोन कार्यरत आहेत. केंद्रप्रमुख १४ पदे असून हे सर्वच पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.