लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना व लाॅकडाऊनमुळे यंदा विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया उशिराने झाली. मात्र शासनाने शैक्षणिक सत्रात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे शिक्षण उशिरा सुरू झाले, तरी परीक्षा मात्र वेळेवरच होणार असल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. विशेषत: पाॅलिटेक्निक आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा घोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फार्मसी आणि पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये संपली. मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे कोरोनामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयेदेखील अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अवघ्या एक ते दीड महिन्यात संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे दिव्य महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांनाही पार करावे लागणार आहे. ॲन्युअल पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना फारसी अडचण येणार नसली तरी सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना मात्र अडचणी जाणार आहे. जिल्ह्यात पाॅलिटेक्निकचे दोन काॅलेज आहेत. यवतमाळातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ८०० तर वणीच्या सुशगंगा काॅलेजमध्ये ४०० विद्यार्थी आहेत. यवतमाळच्या वाधवाणी फार्मसी काॅलेजमध्ये शंभर, कळंबमध्ये शंभर तर दिग्रस व पुसदच्या फार्मसी काॅलेजमध्ये प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. अशा साधारण दीड हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. परीक्षेचे अर्ज भरणे सुरू आठ दिवसांपूर्वी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लगेच परीक्षेचे अर्जही भरावे लागत आहे. महाविद्यालयांनी एक्झाम फाॅर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे काॅलेज सुरू होण्याआधीच परीक्षा कशी घेणार, अभ्यासक्रम कसा आणि कोण पूर्ण करून देणार, विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास जबाबदारी कुणाची, असे प्रश्न निर्माण झाले आहे. सध्या केवळ एक्झाम फाॅर्म भरले जात आहे. परीक्षेची तारीख निश्चित झाली नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले.
काय म्हणतात विद्यार्थी...
जेमतेम आत्ताच ॲडमिशन झाली आहे. अजून तर काॅलेजमध्ये शिकवणेही सुरू झालेले नाही अन् लगेच परीक्षा घेणार तर कशा? लगेच परीक्षा झाली तर अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्यही नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी. - अमेय सरबेरे, यवतमाळ
थोडाबहूत ऑनलाईनवर शिक्षणाचा प्रयत्न केला जात आहे. प्रॅक्टीकल चालू झालेले नाही, कारण अद्याप काॅलेज सुरू झालेली नाही. परीक्षा लगेच होतील की, काही दिवसानंतर होतील हे सध्या तरी आम्हाला कळलेले नाही. - श्रेयस भाले, यवतमाळ
अजून काॅलेजच सुरू झाले नाही तर सिलॅबस पूर्ण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्यक्ष टिचींगही सुरू झालेली नाही. फक्त व्हाॅटस्अप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यावर काॅलेजकडून काही सूचना येत आहेत. - साक्षी गावंडे, यवतमाळ
काॅलेज आणि स्वत: विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, तर सिलॅबस पूर्ण होईल. काही जणांचे तर ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहे. आमचेही होतील. विद्यार्थ्यांनी तयारी केल्यास परीक्षा कधीही झाली तरी अडचण येणार नाही. - वेदश्री लोखंडे, यवतमाळ
परीक्षेचे वेळापत्रक यायचे आहे. मात्र मार्च महिन्याच्या शेवटी परीक्षा होईल, अशी शक्यता दिसत आहे. सेकंड ईअरच्या विद्यार्थ्यांचे तर सुरुवातीपासूनच ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने प्रश्न नाही. समस्या केवळ फर्स्ट ईअरची आहे. थेअरी ऑनलाईन होईल तर १५ दिवस विद्यार्थ्यांना बोलावून प्रॅक्टीकल करून घेता येईल. - प्रा.डाॅ.अनिल चांदेवार, प्राचार्य वाधवाणी फार्मसी काॅलेज, यवतमाळ
पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र साधारण मार्च महिन्यात संपते. यावेळी होणारी परीक्षा ऑनलाईन होणार आहे. तसेच प्रश्नदेखील ऑब्जेक्टीव्ह स्वरूपाचे राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करण्यास फारसी अडचण जाणार नाही. ऑनलाईन क्लासेसमध्ये शिक्षक तयारी करवून घेत आहे. जादा कष्ट घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करू. - डाॅ. डी.एन. शिंगाडे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ