किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड भात देऊन त्यांचे स्वागत करावे, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते. नेर तालुक्यात मात्र शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस उपाशीच गेला. शिक्षण विभागाने पोषण आहाराची मागणी उशिरा केल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जाते.नेर शहरासह तालुक्यात एकूण ९८ शाळा आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. दीर्घ सुटीनंतर परतलेल्या व पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन स्वागत करावे, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते. मात्र याची अंमलबजावणी नेर तालुक्यात झालीच नाही. शिक्षण विभागाने धान्याची मागणी उशिरा केल्याने तालुक्यातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी पोषण आहार पोहोचला नाही. विद्यार्थ्यांना चक्क उपाशी राहण्याची वेळ आली. तालुक्यात नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिल्याच दिवशी त्यांना शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसला. यामुळे पालकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा यंत्रणेकडून खेळखंडोबाच सुरू आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासन अनेक योजना आखते. प्रत्यक्ष त्या राबविल्याच जात नसल्याचे वास्तव आहे.तालुक्यातील शाळेसाठी धान्याची मागणी वेळेवर केली होती. पुरवठादाराने याची दखल घेतली नाही. त्यामुळे आज काही भागात धान्यसाठाच पोहोचला नाही.- एस.आर. राठोड,प्रभारी,शालेय पोषण आहार, नेर
नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गोड घास मिळालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:21 PM
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड भात देऊन त्यांचे स्वागत करावे, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते. नेर तालुक्यात मात्र शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस उपाशीच गेला. शिक्षण विभागाने पोषण आहाराची मागणी उशिरा केल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
ठळक मुद्देगलथान कारभार : पोषण आहार पुरवठ्यावरून अधिकारी, कंत्राटदारात टोलवाटोलवी