शेंबाळपिंपरी (यवतमाळ) : पुसद-हिंगोली रोडवरील आमदरी घाटात गळा चिरलेल्या अवस्थेत युवक पडून होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघड झाली. युवकाचा खून नेमका कोणत्या कारणाने झाला यावरून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
गजानन बंडू लोंढे (२०), रा. मांडवा, ता. पुसद असे मृत युवकाचे नाव आहे. गजानन हा बीएचे शिक्षण घेत होता. सोमवारी सकाळी या मृत युवकाचे फोटो व्हाॅट्सॲपवर व्हायरल झाले. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी सुरू केली. मृत युवकाच्या हातामध्ये ब्लेड होते. मात्र, त्याच्या गळ्यावरचा वार हा तीक्ष्ण हत्याराने केल्यासारखा दिसत होता. अज्ञाताने धारदार शस्त्राचा वापर करीत त्या युवकाचा गळा चिरला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा ठाणेदार बालाजी शिंगपल्लू, उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करीत आहेत.
पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद शासकीय रुग्णालयात नेला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू नेमका कधी झाला, हे उघड होणार आहे. त्यानंतरच पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित होणार आहे. परिसरातून व गजाननच्या महाविद्यालयातून माहिती गोळा केली जात आहे. त्याचा वाद कुणासोबत झाला, तो घाटात कधी आला यासर्व बाबींचा उलगडा झाल्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचता येणार आहे. याशिवाय तांत्रिक बाबींचीही मदत घेतली जात आहे. खुनाचा उलगडा लावण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.