लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही. दैनंदिन वेळापत्रक पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो.मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दारव्हा येथून निघालेल्या एसटी बसच्या टपावरून तिवसा येथील विद्यार्थ्यांनी प्रवास केला. शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी बसफेरी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना हा जीवघेणा पवित्रा घ्यावा लागला. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तास बसस्थानकावरच असतात. सायंकाळची बसही कधीच वेळेवर येत नाही. मंगळवारीसुद्धा बसस्थानकावर घाटंजी मार्गावरील एसटी बसची वाट पाहात विद्यार्थिनी बसून होत्या. सायंकाळचे ७ वाजले तरी ५ वाजता येणारी बस लागलीच नाही. यामुळे विद्यार्थिनींचाही संयम सुटला. त्यांनी याची विचारणा स्थानिक व्यवस्थापकाकडे केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना कधीच वेळेवर शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही. किमान दोन ते तीन तासिका नियमित चुकतात. यामुळे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे.एसटीच्या टपावरून प्रवास करत विद्यार्थी आल्याची माहिती मिळताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकात धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचे काम परिवहनमधील काही अधिकारी करतात, सुरक्षा रक्षकांना समोर करून विद्यार्थ्यांची बाजूही ऐकून घेतली जात नाही.परिवहन महामंडळाला चिंता नाहीज्या मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणाहून शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत जाणीवपूर्वक एक्सप्रेस गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांना थांबा नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. बहुतांश मार्गावरून सर्वसाधारण बसफेºया बंदच झाल्या आहेत. जलद गाड्यांचे थांबे असल्याचे सांगितले जाते मात्र चालक व वाहक बस थांबविण्यास तयार होत नाही. टप्पा नसल्याचे सांगून बस सरळ नेली जाते. अनेकदा विद्यार्थ्यांना परत जातानाही याच समस्यांना सामोरे जावे लागते. अर्धाअधिक वेळ त्यांचा बसस्थानकावरच निघून जातो.
विद्यार्थ्यांचा एसटीच्या टपावरून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:42 PM
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही.
ठळक मुद्देशैक्षणिक भवितव्य धोक्यात : महामंडळाच्या कारभारापुढे विद्यार्थी हतबल