विलास गावंडे
यवतमाळ : आयुर्वेद पदव्युत्तर (पीजी) प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर राज्याची सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. त्यातही ‘रात्र थोडी आणि साेंग फार’ अशी परिस्थिती असल्याने या परीक्षेपासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे. अवघे दोन दिवस हाती असल्याने प्रामुख्याने विदर्भातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. (Students will now have to go to Gujarat, Madhya Pradesh for postgraduate admission in Ayurveda)
आयुष मंत्रालय आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनच्या वतीने (एनसीआयएसएम) अखिल भारतीय स्तरावर ही परीक्षा १८ सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. याकरिता नोंदणी केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातीलच चार केंद्रे निवडली होती. या विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी परीक्षेचे हॉल तिकीट प्राप्त झाले. त्यातील केंद्र पाहून त्यांना धक्का बसला.
नागपूर, मुंबई, पुणे, अकोला, चंद्रपूर, नाशिक, कोल्हापूर, आदी ठिकाणांपैकी कुठलेही चार केंद्रे निवडलेली असताना काही विद्यार्थ्यांना गुजरात, मध्य प्रदेश राज्यांतील परीक्षा केंद्र मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजारांवर विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यातील तीन हजारांहून अधिक, प्रामुख्याने विदर्भ आणि मुंबई भागातील विद्यार्थ्यांना अन्य राज्यांतील केंद्र देण्यात आले आहे.
परीक्षेसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. इतक्या कमी कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. रेल्वेचे आरक्षण मिळविणे किंवा इतर साधनांद्वारे पोहोचण्यासाठी अवधी लागणार आहे. यात त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. आर्थिक भुर्दंड बसणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्राचा पर्याय दिला असताना इतर राज्यांतील परीक्षा केंद्र का, असा या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. दरम्यान, या संदर्भात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने परीक्षा घेत असलेल्या एजन्सीकडे पत्रव्यवहार केला आहे. इतर राज्यांतील केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोयीचे असलेले महाराष्ट्रातील केंद्र द्यावे, अशी मागणी केली आहे.
विदर्भात आठ महाविद्यालये
पदव्युत्तर शिक्षण देणारी विदर्भात आठ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यामध्ये एक शासकीय, चार अनुदानित आणि तीन खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. आयुर्वेद शाखेतील विविध विषयांचे शिक्षण या महाविद्यालयांत दिले जाते.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडले असताना अन्य राज्यांतील केंद्र देण्यात आले. यामुळे त्यांना आजच्या कोविड स्थितीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी निवडलेलेच परीक्षा केंद्र देण्यात यावे. शिवाय केंद्र बदलाची चौकशी करावी.
- डॉ. मोहन येंडे, महाराष्ट्र संघटक, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन