लोकमत न्यूज नेटवर्कदराटी : उमरखेड तालुक्यातील बोरी (वन) येथील जत्रा परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी दराटी पोलीस ठाण्याचे पथक गेले होते. पोलीस मागे लागल्याने पळताना एका युवकाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने दोन पोलिसांना गावातील एका खोलीत डांबून ठेवले. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी संतप्त जमावाने दराटी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.संजय विठ्ठल बुरकुले (३५) रा.बोरी (वन) असे पळापळीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दराटी पोलिसांनी सोमवारी बोरी वन व नागडोह परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड घातली. जमादार युवराज जाधव, प्रल्हाद साबळे, अंकुश गालफाडे, अमरनाथ राठोड आणि एक गृहरक्षक दलाचा जवान यांनी संजयला मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीतून केला. त्यासाठी आदिवासी बांधवांनी मंगळवारी दराटी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. माजी आमदार उत्तमराव इंगळे आणि दराटीचे प्रभारी ठाणेदार माजरम यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. त्यानंतर यवतमाळ येथे संजयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला.दरम्यान, सोमवारी संजयचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच संतप्त जमावाने पोलिसांना ओलिस धरून मारहाण केल्याचे सांगितले जाते. मात्र सदाशिव वानोळे यांनी प्रसंगावधान राखून सदर पोलीस व पोलीस पाटील श्रीरंग पोटे यांना गावातीलच एका घरात कोंडून बाहेरून कुलूप लावले. यामुळे पोलिसांचे प्राण वाचल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्यासह उमरखेड, बिटरगाव व एलसीबीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत संजयचा मृतदेह किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. मात्र कुटुंबीयांनी संजयचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे संजयचा मृतदेह यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत उत्तरीय तपासणीला सुरुवात झाली नव्हती. या प्रकरणात संबंधित पोलीस व पोलीस पाटील यांच्यावर आपल्या पतीचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संजयची पत्नी साधना बुरकुले यांनी केली आहे.
‘त्या’ पोलिसांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 10:15 PM
उमरखेड तालुक्यातील बोरी (वन) येथील जत्रा परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी दराटी पोलीस ठाण्याचे पथक गेले होते. पोलीस मागे लागल्याने पळताना एका युवकाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने दोन पोलिसांना गावातील एका खोलीत डांबून ठेवले.
ठळक मुद्देबोरीच्या आदिवासी बांधवांची मागणी : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप