विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे बोगस दाखले सादर करण्याचा प्रताप ‘एसटी’च्या काही विभाग नियंत्रकांनी केला आहे. विशेष म्हणजे ही माहिती परिवहनमंत्र्यांना सादर करण्यासाठी मागविण्यात आली होती. वाहतूक नियंत्रकांना चक्र कामगिरी देण्यात आल्याची बनावट माहिती सादर करण्यात आली आहे.मुक्कामी कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कामांचा ‘ब्रेक डाऊन’ झाला आहे. कित्येक वर्ष एकाच ठिकाणी चिपकून असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक कामाचा अनुभव यावा यासाठी चक्र कामगिरी देण्याचे निर्देश आहे. प्रामुख्याने वाहतूक नियंत्रकांसाठी विशेष सूचना आहेत. वाहतुकीची हाताळणी, चौकशी कक्ष, विद्यार्थी पास आदी प्रकारची कामगिरी त्यांच्यावर सोपविली जावी, अशा सूचना आहे. प्रत्येक टेबलवर ते पारंगत व्हावे, हा यामागिल उद्देश आहे. मात्र विभाग पातळीवर याची अंमलबजावणी होत नाही.वाहतूक नियंत्रकांना चक्र कामगिरी देण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना वरिष्ठांकडून करण्यात आल्या होत्या. या सूचनेची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती सादर करावी, असे कळविले होते. मागविलेली माहिती विभाग नियंत्रकांनी २२ मे २०१८ पर्यंत महामंडळाला सादर केली आणि भंडाफोड झाला. अनेक विभागांनी बोगस दाखले सादर केल्याचे पुढे आले. चक्र कामगिरी दिली नसलेल्या वाहतूक नियंत्रकांचीही माहिती सादर करण्यात आली. विभाग नियंत्रकांच्या या धाडसाने परिवहनमंत्री चांगलेच संतापले. तीव्र शब्दात त्यांनी नापसंती व्यक्त केली. आता पुन्हा सत्य माहिती मागविण्यात आली आहे. पुन्हा हाच कित्ता गिरविल्यास गंभीर दखल घेण्याचा इशारा दिला आहे.
तुटवड्यातही चालक-वाहक टेबलवरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक-वाहकांचा तुटवडा आहे. परिणामी अनेकदा फेऱ्या रद्द होतात. महामंडळाचे आर्थिक नुकसान होते. तरीही काही आगारात या कामगारांकडे टेबलवरील कामगिरी दिली जाते. तात्पुरती नव्हे तर, दीर्घ काळासाठी त्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आता या कामगारांना त्यांचीच जबाबदारी सांभाळू द्या, असा आदेश काढण्यात आला आहे. तिकीट आणि रोकड विभागात वाहक, वाहतूक नियंत्रकांचा सर्रास वापर सुरू आहे. यालाही बे्रक लावण्यात येत आहे. ड्यूटी अलोकेशन लावणाऱ्या पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी (अॅडजेस्टमेंट) वाहतूक नियंत्रक-वाहक यांना घेऊ नका, अशी ताकीद देण्यात आली आहे.