मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यामुळे नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. नाल्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत न झाल्यास येत्या पावसाळ्यातही नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. लेंडी नाल्यात ठिकठिकाणी पाणी साचून दुर्गंधी सुटली आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात याच नाल्याच्या पुराचे पाणी लगतची घरे आणि दुकानांमध्ये शिरून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पूर्वी शेतातून वाहणारा हा नाला आता ले-आऊट पडल्यामुळे शहराच्या मध्यभागी आला आहे. जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून रेल्वे स्टेशन परिसर, स्वप्नपूर्तीनगर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर काॅलनी, गोळीबार चौक व एका मंगल कार्यालयाजवळून हा नाला शहराबाहेर जातो. या नाल्याच्या दोन्ही बाजूने झुडूपे वाढली आहे. ठिकठिकाणी माती खचून सांडपाण्याचा प्रवाह अवरुद्ध झाला.पावसाळ्यात नाल्याला पूर येतो. पुराच्या पाण्यासाठी माती, झाडे, झुडुपे लगतच्या घरात व दुकानात शिरतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. त्याकडे यंत्रणेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. टेकडीकडील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी ठिकठिकाणी बांध टाकण्याची गरज आहे. तसेच नाल्याचे व त्यावरील पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. पालिका दरवर्षी केवळ मान्सूनपूर्व साफसफाई करून वेळ मारून नेते. मूळ समस्या मात्र कायम राहते. त्यामुळे निम्म्या शहरातील नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. नुकसानीनंतर सर्वेक्षण करण्यात आले. मात्र उपाययोजना झाली नाही.
अनेकदा बसला तडाखा, २०१८ मध्ये कंबरभर पाण्यातून काढावा लागला रस्ता - लेंडी नाल्याच्या पुराचा परिसरातील नागरिकांना अनेकदा तडाखा बसला. २०१८ मध्ये तर जून आणि ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो घरे, दुकाने आणि वाहनांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. - शिवाजी स्टेडियम, बचत भवनमधील बॅडमिंटन कोर्ट उखडला होता. - शहराचे हृदयस्थान असणारा गोळीबार चौक, बसस्थानक परिसर, यवतमाळ आणि आर्णी मार्गावर कंबरभर पाणी साचले होते.
नाल्यातील घाण पाण्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात सातत्याने पुराचा धोका असतो. घाण पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. - धनंजय बलखंडे
मागील वर्षी पुरामुळे घर खचले. अन्नधान्य, संपूर्ण साहित्य भिजून खराब झाले. यावर्षी तीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. लेंडी नाल्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. पालिकेने तातडीने उपाययाेजना करावी. - गणेश पाटील, पूरग्रस्त
दोन वर्षांपूर्वी लेंडी नाल्याच्या पुराचे पाणी बचत भवनात शिरले होते. त्यामुळे येथील बॅडमिंटन कोर्टाचे लाखोंचे नुकसान झाले. अनेक दिवस खेळाडूंना खेळण्यापासून वंचित रहावे लागले. पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न व्हावेत. - किशोर घेरवरा, खेळाडू
लेंडी नाल्यापासून दुकान बरेच दूर असूनही पुराचे पाणी दुकानात शिरते. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण दुकान अक्षरश: पुराच्या पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने लेंडी नाल्यासह इतरही छोट्या नाल्यांचा बंदोबस्त करावा. - दिलीप शिंदे, व्यावसायिक