उमरखेड : कापूस पणन महासंघाच्या गलथान कारभारामुळे ४७ क्विंटलचा चेक देण्याऐवजी केवळ चार क्विंटल ६० किलोचा चेक शेतकऱ्याला दिला. त्यामुळे सदर शेतकरी विष घेऊन महासंघाच्या कार्यालयात गेला.उमरखेड तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. तालुक्यातील चातारी येथील शेतकरी बाबुराव देवराव माने यांनी २७ जानेवारीला ट्रॅक्टरद्वारे ४७ क्विंटल कापूस महासंघात दिला. या बाबतची काटा पावतीही त्यांनी घेतली. परंतु यवतमाळ येथील पणन महासंघाच्या कार्यालयाच्या दुर्लक्षित कारभारामुळे ४७ क्विंटलऐवजी केवळ चार क्विंटल ६० किलो कापसाचा धनादेश त्यांना देण्यात आला. हा धनादेश पाहून माने यांना धक्काच बसला. त्यांनी तडक पणन महासंघाचे कार्यालय सकाळी १० वाजताच गाठले आणि हा धनादेश चुकीचा असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतरही तेथील कर्मचारी त्यांची समस्या ऐकून घेण्यास तयार नव्हते. अखेरीस बाबुराव माने यांनी विषाचा डबा घेवून कार्यालयात प्रवेश केला आणि या प्रकरणी मला त्वरित न्याय द्या, अन्यथा मी येथेच आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.हे ऐकून कार्यालयात एकच तारांबळ उडाली. ग्रेडर एम.जी. पुरणकर हे तत्काळ कार्यालयात हजर झाले आणि सदर प्रकरणाची चौकशी केली असता माने यांना मिळालेला चेक चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. ही चुकी यवतमाळ कार्यालयाची आहे. त्यांच्यासोबत संपर्क साधून माने यांना न्याय दिला जाणार असल्याचे ग्रेडर यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. (शहर प्रतिनिधी)
पणन महासंघाच्या चुकीमुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ
By admin | Published: February 25, 2015 2:25 AM