महागाव (यवतमाळ) : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम उद्ध्वस्त केला आहे. यामुळे हादरलेल्या एका शेतकऱ्यांने उटी येथे स्वत:च्या शेतातच विजेची तार पायाला गुंडाळून आत्महत्या केली. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली.
पंजाबराव महादेवराव गावंडे (६०) रा.उटी असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे. गावंडे यांच्याकडे अडीच एकर शेती असून ते स्वत: शेतात राबत होते. यावर्षी त्यांनी कापसाची लागवड केली. गावंडे यांची पत्नी दुर्धर आजाराने दोन वर्षांपासून अंथरूनाला खिळली आहे. तिच्या उपचारासाठी गावंडे यांच्यावर अनेकांचे कर्ज झाले आहे. अशाही स्थितीत ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. यावर्षी पावसाने त्यांची कापसाची शेती उद्ध्वस्त केली. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते.
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले. तेथे त्यांनी मोटरपंपाच्या पेटीजवळ विजेची वायर पायाला गुंडाळून घेतली व वीज प्रवाह सुरू केला. हा प्रकार शेजारच्या शेतातील शेतक-यांनी पाहिला. धाव घेईपर्यंत गावंडे यांची प्राणज्योत मावळली होती. ही थरारक घटना कुटुंबीयांना सांगितली. मुलगा विश्वास याने शेताकडे धाव घेतली. वडिलांना लगतच्या सवना येथील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मृत् घोषित केले. या प्रकरणी संतोष दत्तराव गावंडे यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. गावंडे यांना तीन विवाहित मुली व एक विवाहित मुलगा आहे.