यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानांतर्गत जोतिबा दीनबंधू कल्याण मंडळाच्या वतीने कळंब येथील अनसूया काळे या आत्महत्याग्रस्त विधवेला मंडळाचे अध्यक्ष देवीदास अराठे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले मंडळाचे सचिव राजेंद्र कठाळे, डॉ. विजय कावलकर यांच्याहस्ते शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उभारी मिळावी, त्यांच्यामध्ये उमेद निर्माण व्हावी, आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी शासन, प्रशासन आणि जिल्हाभरातील नागरिक बळीराजा चेतना अभियान राबवीत आहे. त्याचप्रमाणे गरजवंत शेतकरी कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा. पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाचा सांभाळ सक्षमपणे करता यावा यासाठी रोजगाराचे साधन म्हणून शिलाई मशिन वितरित करण्यात आली. गरजवंत शेतकरी महिलांना रोजगार मिळावा यासाठी इतर संस्थांनी आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन बळीराजा चेतना अभियानाचे चेतनादूत म्हणून काम करण्यास पुढे यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. या कार्यक्रमाला यावेळी मंडळाचे निमंत्रक संजय ठाकरे, राजू मालखेडे, संजय येवतकर, मनोज गोरे, वसंत नाल्हे, महेंद्र पिसे, कैलास ढुमणे यांच्यासह मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदतीमध्ये सातत्य४आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी यापुढेही मंडळाकडून मदत केली जाईल. तसेच शेतकरी आत्महत्या होणारच नाहीत, यासाठी बळीराजा चेतना अभियानात चेतनादूत म्हणून मंडळ काम करेल, असे प्रतिपादन सचिव राजेंद्र कठाळे यांनी केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना सर्वतोपरी मदत
By admin | Published: April 18, 2016 4:57 AM