फौजदारीचे संकेत : ३१ मे रोजी सुनावणी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वाजवीपेक्षा जादा तूर विक्री केलेल्या शंभरावर शेतकऱ्यांना सहकार विभागाने समन्स बजावले. त्यांना दस्तवेजासह सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले आहे. तूर खरेदीची शासकीय केंद्रांवर चौकशी सुरू झाली. यवतमाळ येथे तूर विक्री करणाऱ्या १०० शेतकऱ्यांना सहकार विभागाने समन्स पाठविले. येथील शासकीय तूर खरेदी केंद्राने आत्तापर्यंत २५ हजार ६७१ क्विंटल तुरीची खरेदी केली. मात्र यात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी तूर विकल्याचा संशय आहे. त्यामुळे सहकार विभागाने चौकशी सुरू केली. त्यातून ३० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार विभागाने समन्स बजावले आहे. येथील केंद्रावर एकाच सातबाऱ्यावर ७५ ते १०० क्विंटल तुरीची खरेदी झाल्याचे सहकार विभागाला आढळले आहे. त्यामुळे आता य्अशा शेतकऱ्यांना सातबारा, पेरेपत्रक, आधारकार्ड, सादर करण्याचे निर्देश दिले. ३१ मे रोजी त्यांची सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांकडे पेरेपत्रक नसेल, पेरेपत्रकात खोडतोड असेल, अशांचे चुकारे थांबणार आहे. खरेदी झालेली तूर व्यापाऱ्यांची असल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शंभरावर तूर विक्रेत्या शेतकऱ्यांना समन्स
By admin | Published: May 27, 2017 12:13 AM