यवतमाळ : बाजार समितीचे संचालक शिवसैनिक सुनील डिवरे यांची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गंभीर घटनेची दखल घेत शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी विश्रामगृहावर पार पडली. घटनेचा निषेध नोंदवीत कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिवसैनिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले.
सुनील डिवरे यांची हत्या ही राजकीय पार्श्वभूमीवरच झाली आहे. मारेकरी अटकेत असले तरी या हत्याकांडामागचे खरे सूत्रधार पोलिसांनी शाेधून काढावेत, शिवसैनिकावर घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्याची हिंमत अटकेतील मारेकऱ्यांची नाही. त्याच्यामागे पाठीराखे आहेत. त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा, तसेच तक्रारीत नाव असलेले तीन आरोपी अजूनही पसार आहेत. त्यांनाही अटक केली जावी, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.
प्रत्येकानेच आपल्या संतप्त भावना यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यापुढे व्यक्त केल्या. निर्धारित वेळेत या गुन्ह्याचा उलगडा करून पडद्यामागील आरोपींना अटक केली जावी, दोषारोपपत्र गुणवत्तापूर्ण तयार केेले जावे, न्यायालयात आरोपी सुटू नये यासाठी शस्त्र जप्ती व इतर प्रक्रिया करताना पंच भरोशाचे घ्यावेत, अशा सूचना शिवसैनिकांनी केल्या. एसपी भुजबळ पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास गुणवत्तापूर्णच केला जाईल, तक्रारीत नाव असलेले व पाठीमागून कट रचणारे या सर्वांचाच शोध घेऊन अटक करण्यात येईल. कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी दोषारोपपत्रही तयार केले जाईल, असे आश्वासन दिले.
आमदार संजय राठोड व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. यवतमाळ शहरातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. नवोदितांचा सराईत गुन्हेगारांकडून वापर करून घेतला जातो, त्यांंना शस्त्र दिले जातात. जामिनासाठी मदत केली जाते, यामुळेच अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. मुलांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.