यवतमाळ : वाऱ्याहून वेगवान असलेला सोशल मीडिया आधुनिक जीवनशैलीचा निदर्शक असला तरी याच मीडियाचा गैरवापर करून अंधश्रद्धेला कसे खतपाणी घातले जाते, याचे उदाहरण सध्या जिल्ह्यात पुढे आले आहे.
महाराष्ट्रात कुठेतरी दगडाचा नंदी चमचाने दूध पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विकासकामे वर्षानुवर्षे न पोहोचणाऱ्या जिल्ह्यातील खेड्यापाड्यात तो व्हिडिओ क्षणार्धात पोहोचला आणि भोळ्या भाविकांच्या मनाचा ताबा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकही आपापल्या गावातील मंदिरांमध्ये दगडाच्या नंदीला पाणी पाजून पाहू लागले. काही जणांच्या मते हा श्रद्धेचा भाग असला तरी जाणकार याला अंधश्रद्धा ठरवित आहे.
महागाव तालुक्यातील मुडाणा, पांढरकवडा, वणी, उमरखेड तालुक्यातील ढाणकी, नेर तालुक्यातील मांगलादेवी आदी गावांमध्ये हा प्रकार शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत अखंड सुरू होता. मुडाणाच्या नेहरूनगरातील महादेव मंदिरात दगडाचा नंदी पाणी पित असल्याचे लोकांना कुठून तरी कळले. संजय भदाडे, रवी काळे यांनी लगेच दर्शन घेतले.
कर्णोपकर्णी हा प्रकार सर्वत्र पसरताच आजूबाजूचे धारमोहा, कोठारी, बोथा, साधूनगर, बेलदरी, धारेगाव, उटी येथील गावकऱ्यांनी नंदीला पाणी पाजण्यासाठी तर काहींनी उत्सुकतेपोटी या मंदिरात धाव घेतली. असाच प्रकार मांगलादेवी, वणी शहरातील सास्तीनगर भागातील मंदिरातही घडला. पांढरकवडा येथील शिबला रोडवर जय संतोषी माता मंदिरालगत असलेला नंदीही पाणी पित असल्याची वार्ता पसरली. त्यामुळे महिलांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी त्याचाही व्हिडीओ बनवून व्हायरल केला.
उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे ग्रामदेवता असलेल्या हनुमान मंदिरातही महादेवाच्या पिंडीसह दगडाचा नंदी बैली आहे. सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून काही गावकऱ्यांनी या नंदी बैलालाही पाणी पाजून पाहिले. विशेष म्हणजे, हा प्रकार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. भोळ्या भाविकांनी या प्रकाराला दैवी चमत्कार मानले. मात्र विज्ञानाचे जाणकार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा कोणताही दैवी चमत्कार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र सलग दोन दिवस भाबड्या भाविकांच्या मनातून दगडी नंदीला पाणी पाजण्याची उत्सुकता काही संपली नाही.
नातेवाइकांनी वाढविली उत्सुकता अन् अफवा
आपल्या गावात नंदी दूध-पाणी पितो, असे परगावच्या नातेवाइकांनी खेड्यापाड्यातील नातेवाइकांना फोन करून कळविले. त्यामुळे खेड्यातील नागरिकांनी उत्सुकतेपोटी आपल्याही गावात हा प्रकार घडतो का, हे करून पाहिले. त्यातूनच गावोगावी हे लोन पोहोचले.
निर्जीव मूर्ती दूध किंवा पाणी पिते ही अंधश्रद्धा आहे. क्वचित प्रसंगी केपिलरी फोर्समुळे पाणी मूर्तीच्या आत खेचले जाते. त्याला सरफेश टेन्शन म्हटले जाते.
- सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक