यवतमाळ : आर्णी तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील तीन वर्षीय मानवी चोलेच्या खूनप्रकरणात तिची सख्खी काकू दीपाली हिला अटक करण्यात आली आहे. सात दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आले असले तरी चिमुकल्या मानवीचा दीपालीने नेमक्या कुठल्या कारणासाठी इतक्या निर्घृणपणे खून केला, हा प्रश्न कायमच आहे. मानवीचा खून ऐन पाैर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी झाला आहे. त्यामुळे हा खून नरबळी असल्याचा संशय असून त्यादृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तीन वर्षीय मानवी २० डिसेंबरपासून बेपत्ता होती. सात दिवसांनंतर तिचा खून तिची काकू दीपाली हिने केल्याचे उघडकीस आले. घरातील धान्याच्या कोठीत मानवीचा मृतदेह दडवून ठेवण्यात आला होता. मानवी आणि दीपालीचे कुटुंब शेजारी-शेजारीच राहत होते. दोन्ही कुटुंबात संबंधही चांगले होते. कधी एकमेकांशी त्यांचे भांडणही नव्हते. पोलिसांनी आरोपीचा शोध लावला असला तरी दीपालीने चिमुरड्या मानवीचा इतक्या निर्दयीपणे खून नेमका कशासाठी केला, असा प्रश्न उभा राहिला आहे. दीपालीचे एकूण वर्तन आणि घटनास्थळावरची परिस्थिती पाहता हा खून म्हणजे नरबळीच असल्याचा संशय असून पोलीस आता त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.
विशेष म्हणजे, मानवीचा खून झाला त्याच्या आदल्या दिवशी १९ डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा होती. पौर्णिमेनंतरचा प्रदोष काळ हा तांत्रिक-मांत्रिक त्यांच्या दृष्टीने उपयुक्त समजतात. त्यातही यावेळची अशा पद्धतीची पौर्णिमा १०० वर्षांनंतर आल्याचे सांगितले जाते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही खुनाची निर्घृण घटना घडल्याने तो नरबळीचा प्रकार तर नव्हे ना, अशी शंका पोलिसांना आहे.
पैशाच्या लोभाने अंधश्रद्धेच्या मार्गावर
काकू दीपालीचा नवरा व्यसनी, तर, सासरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. दुसरीकडे दीपालीचे माहेर मात्र सधन. यातूनच पैशाच्या लोभाने दीपाली अंधश्रद्धेच्या मार्गावर गेली असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मीपूजक असलेल्या दीपालीच्या घरात मोठा देव्हारा असून तेथे आठ ते दहा मूर्तीही आढळलेल्या आहेत.