सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्यात सरकारी पुरवठादार असलेल्या औषधी कंपन्यांकडून गुणवत्ता नसलेली औषधी पुरविण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नागपूर त्यानंतर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असा प्रकार उघडकीस आला. लाखो रुग्णांना ही औषधी देण्यात आली. त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आलेल्या कॅल्शियम सिरपला बुरशी लागल्याचे उघड झाले आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून औषधी वितरण केले जाते. शासनस्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादार कंपन्या ही औषधी देतात. अपवादात्मक परिस्थिती स्थानिक पातळीवर खरेदीचा निर्णय होतो. पुरवठादार कंपनीने दिलेली औषधी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व तेथून प्राथमिक आरोग्य केंद्रावर देण्यात येतात. ग्रामीण भागात महिला व मुलांमध्ये तसेच वृद्धांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळून येते. यासाठी त्यांना गोळी व सिरपच्या माध्यमातून कॅल्शियम देण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्लायसीकॅल-बी १२ हे सिरप पाठविण्यात आले. ग्लासीअर फार्मास्युटिकल्स प्रा.लि. अमरावती या कंपनीकडून हे सिरप पुरविण्यात आले. या सीलबंद औषधाला बुरशी लागल्याचे निदर्शनास आले. या सिरपचा बॅच क्र. क्यूएल ०६०१, क्यूएल ०६०३ असा आहे. ६ जून २०२४ मध्ये हे औषध तयार झाले असून याची एक्सपायरी मे २०२६ पर्यंत आहे. ३२९ सीलबंद बॉटल्स बुरशी लागलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
जिल्ह्यातील खैरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव (ता. कळंब), अकोला बाजार (ता. यवतमाळ), घारफळ (ता. बाभूळगाव) या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हा प्रकार निदर्शनास आला आहे. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ यांना दिली आहे. याबाबत अजून चौकशी झालेली नाही. या बॅचचे सिरप इतर कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर, उपकेंद्रावर पोहोचले आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
'त्या' औषधांचे 'एफडीए'कडे नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बुरशी आढळून आलेल्या कॅल्शियम सिरपचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालया- कडून देण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात या औषधांचा पुरवठा झाला होता. अन्न व औषधी प्रशासन विभागाने या सिरपचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई होईल.